बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ही समस्या वाढत चालली आहे. बैठी कामाचे स्वरूप, पुरेसा व्यायाम न करणे, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, आहारात जंक फुडचा भडीमार यांमुळे वजन लगेच वाढते. वजन वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
एखाद्या व्यक्तीचे वजन किती असावे हे ‘बॉडी मास इंडेक्स’वरून ठरवले जाते. ‘बॉडी मास इंडेक्स’ म्हणजे शरीराची उंची आणि वजनाचे योग्य प्रमाण सांगणारे समीकरण. ‘बॉडी मास इंडेक्स’प्रमाणे जर तुमचे वजन असेल तर चिंता करण्याची गरज नसते. पण त्यानुसार जर वजन वाढले असेल तर वेळीच वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू करावे. कारण वजन वाढल्यास आपल्या शरीराचा आकार बदलण्याबरोबर अनेक आजर होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हीदेखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी काही पेयं तुम्हाला मदत करू शकतात. कोणती आहेत ही पेयं जाणून घ्या.
आणखी वाचा : लोखंड, स्टील, ॲल्युमिनियम की मातीची? तज्ञांच्या मते जेवण बनवण्यासाठी कोणती भांडी वापरावी जाणून घ्या
ग्रीन टी
काही रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ‘ग्रीन टी’मध्ये अँटीऑक्सिडंट पॉलीफेनोल आढळतात, जे शरीरातील चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
दालचिनीचा चहा
दालचिनी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. दालचिनी खाल्ल्याने शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच सकाळी दालचिनीचा चहा प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत मिळते. यासर्व फायद्यांसह दालचिनीचा चहा प्यायल्याने पोटाजवळील चरबी कमी होते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
ब्लॅक कॉफी
कॉफीमध्ये आढळणारे थियोब्रोमाइन, थियोफायलिइन आणि क्लोरोजेनिक ॲसिड वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
मध आणि लिंबू
लिंबू आणि मध एकत्र घेतल्याने चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते. यासाठी रोज सकाळी एक ग्लास पाण्यात थोडे मध टाकून आणि लिंबू पिळून पिऊ शकता.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)