Multivitamin Tablets: वाढत्या वयासह शरीरात पोषक घटकांची कमतरता जाणवू लागते. अशा वेळी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक लोक मल्टीव्हिटॅमिन गोळ्या घेतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे खूप महत्त्वाची असतात. जर तुम्हीही दररोज मल्टीव्हिटॅमिन गोळ्या घेत असाल, तर त्याऐवजी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करणाऱ्या पदार्थांचा समावेश करू शकता.
‘या’ पदार्थांत व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करण्याची क्षमता
हिरव्या पालेभाज्यांचे सेवन
तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करू शकता. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात पालक, मेथी, मोहरी व ब्रोकोली यांसारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश करू शकता. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, के, लोह व मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर डिटॉक्स होते.
ड्रायफ्रुट्स आणि बियांचे सेवन
तुम्ही दररोज काही ड्रायफ्रुट्स आणि बियांचे सेवन करायला हवे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यात बदाम, अक्रोड, काजू, चिया सीड्स यांसारखे ड्रायफ्रुट्स किंवा बिया (सूर्यफूल, भोपळा, कलिंगड) इत्यादी खाऊ शकता. ड्रायफ्रुट्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, झिंक व मॅग्नेशियम हे घटक आढळतात, जे हृदय, मेंदू व त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.
दुग्धजन्य पदार्थ
दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिनांचे खूप चांगले स्रोत आहेत. तुम्ही तुमच्या आहारात दूध, दही, चीज व तूप यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश केला पाहिजे. खरं तर, दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ व प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात.
संपूर्ण धान्य
आहारात डाळी आणि हरभरा, राजमा, मसूर, ब्राउन राईस, ओट्स इत्यादी संपूर्ण धान्येदेखील असावीत. हे पदार्थ खाल्ल्याने प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स व लोह यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक शरीराला सहजगत्या मिळू शकतात. शिवाय त्यामुळे शरीराला ऊर्जाही मिळते.
फळांचा समावेश
तुम्ही दररोज एक फळ खाऊ शकता. त्यामध्ये तुम्ही संत्री, केळी, सफरचंद, पपई, डाळिंब इत्यादींचा समावेश करू शकता. दररोज एक फळ खाल्ल्याने तुम्हाला नैसर्गिक साखर मिळते, जी तुम्हाला ऊर्जा प्रदान करते.