कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला रोज अनेक प्रकारच्या व्यक्तींचा सामना करावा लागतो. नेहमीच तुमच्या जवळचे मित्र वा मैत्रिणी किंवा सहकारी तुमच्याबरोबर नसतील. त्यात अनेकदा काही उद्धट व्यक्तींचाही सामना करावा लागू शकतो. अनेकादा या उद्धट व्यक्ती ओळखीच्या असू शकतात किंवा अनोळखी. त्यामुळे शाळा-कॉलेज, ऑफिस किंवा घरातही मनात नसेल तरी त्या उद्धट व्यक्तीबरोबर बोलावे लागते, काम करावे लागते. या व्यक्तींचा उद्धटपणा अनेकदा वाईट बोलण्या-वागण्यातून दिसून येतो; ज्या काही वेळा तुमचा चारचौघांत अपमान करतात, वाईट बोलतात, वागतात. त्यामुळे कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नाही. अशा वेळी उद्धट व्यक्तींसोबत कशा प्रकारे डील करायचे जाणून घ्या …
१) व्यक्तीला सामोरे जा
जर तुमची चुकी नसताना कोणी तुमच्याशी उद्धट वागले, तर थोडा वेळ थांबा आणि दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर त्या व्यक्तीला जाणीव करून द्या की, त्याने असे काहीतरी केले आहे किंवा सांगितले आहे; ज्याची काही गरज नव्हती. जर ती व्यक्ती स्वत:हून काही बोलत नसेल किंवा कबूल करीत नसेल, तर तिला थेट जाऊन विचारा. जसे की, तुम्हाला नेमके म्हणायचे काय होते? किंवा तुम्ही स्वतः असे काही ऐकून घेतले असते का?
२) शांत राहा, संयम ठेवा
जरी तुमच्यासमोर एखादी सर्वांत उद्धट व्यक्ती उभी असेल आणि तुमचे तिच्याकडे काही काम असेल, तर तिच्याशी डोके शांत ठेवून बोला. ती कसेही बोलली तरी तुमचा संयम गमावू नका. प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे लोक त्या व्यक्तीच्या उद्धट वागण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतील; तुमच्या नाही. परिस्थितीनुसार तुम्ही अस्वस्थ असाल, तर अनावश्यक ताण वाढू शकतो.
३) सभ्यतेने वागण्याचा प्रयत्न करा
तुमच्याबरोबर उद्धट बोलणारी व्यक्ती अनेकदा खऱ्या आयुष्यात तशी कदाचित नसेलही. पण, तुम्ही तिच्याशी बोलायला गेलात, त्यावेळी ती खूप तणावाखाली असेल किंवा एखाद्या समस्येचा सामना करीत असेल म्हणून तुमच्यासोबत ती खूप उद्धट वागली असेल. त्यामुळे तुम्ही नेहमीच्या विनम्र पद्धतीने उत्तर दिले पाहिजे. तसेच त्या व्यक्तीचा मूड बघून तिला सर्व काही ठीक आहे ना, असा प्रश्न विचारू शकता. तुमच्या अशा एका प्रश्नाने समोरच्या व्यक्तीची तुमच्याशी बोलण्याची पद्धत बदलू शकते.
४) वैयक्तिकरीत्या घेऊ नका
तुमच्याशी उद्धट वागणारी व्यक्ती नेहमी सारखीच असेल, असे नाही. दिवसभरातील विविध परिस्थितींचा परिणाम म्हणून एखाद्याची मनस्थिती आणि वागणूक उद्धट स्वरूपाची होते. अशा वेळी व्यक्तीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचा उद्धटपणा वैयक्तिकरीत्या घेऊ नका.
५) तणाव कमी करण्यासाठी विनोद वापरा
असभ्य व्यक्ती चिंताग्रस्त होऊ शकते आणि त्याचा सभोवतालच्या लोकांवर ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत, वातावरण तणावमुक्त करण्यासाठी सौम्य व्यंगात्मक टिप्पणीचा अवलंब केला जाऊ शकतो; जेणेकरून इतर व्यक्ती कोणाच्याही भावना दुखावल्याशिवाय हसतील. हे असभ्य असणाऱ्या व्यक्तीला एक लहान ब्रेक देईल आणि त्यांना त्यांच्या वर्तनावर विचार करण्याची संधी देईल.
६) जमत नसल्यास अशा व्यक्तींना टाळण्याचा प्रयत्न करा
जर तुम्ही उद्धट वागणाऱ्या व्यक्तीबरोबर कितीही चांगले राहण्याचा प्रयत्न केला असेल, तिच्या अनेक गोष्टी विनाकारण ऐकल्या असलीत, सहन केल्या असतील आणि आता तुमची सहन करण्याची ताकद संपली असेल, तर शक्य तितके त्या व्यक्तीला टाळण्याचा प्रयत्न करा. कारण- फक्त एका व्यक्तीच्या वागण्यामुळे दिवसभर तुमचा मूड खराब करण्यात काही अर्थ नाही.