दिवाळीची सुट्टी संपली आणि आता काही दिवसांवर नाताळची सुट्टी आलीये. मागच्या काही काळात अशी सुट्टी मिळाली की परदेशवारी करणे हे अगदीच सामान्य झाले आहे. अशाठिकाणी जाताना पासपोर्ट आणि सामानसुमान याबरोबरच अजून एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे पैसे. जास्त लांब जाताना फार रोख रक्कम न्यायची नसते. त्याशिवाय, तुम्हाला नेमकी जेवढी रक्कम हवी आहे ती परकीय चलनात बदलून घेणे म्हणजे एक डोकेदुखीच असते. त्यामुळे या सगळ्या कटकटीपासून सुटका करुन घेण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे केव्हाही चांगले. हे कार्ड वापरणे सोपे, सुरक्षित असते. त्यामुळे तुम्हाला खरेदीवर डिस्काऊंट आणि कॅशबॅक मिळतात. एकीकडे क्रेडिट कार्डमुळे तुमचे व्यवहार अनेक अंगांनी सुकर होत असतात, तर त्याचा वापर परदेशात करणे आणि भारतात करणे यात काय फरक आहे ते जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे परदेशवारी करणार असाल तर त्याविषयी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते पाहूया…

तुमचे कार्ड भारतातील बहुतेक व्यापाऱ्यांकडे कदाचित स्वीकारले जात असेल, पण दुसऱ्या देशात असे होईलच असे नाही. म्हणून तुम्ही ज्या देशात जाणार आहात त्या देशात तुमचे क्रेडिट कार्ड वैध असेल किंवा काय हे तुमच्या क्रेडिट कार्ड कंपनीकडून जाणून घ्या. तुमचे कार्ड स्वीकारले जाईल की नाही, याविषयी जर तुम्हाला खात्री नसेल, तर तुम्ही अधिक विस्तृतपणे स्वीकारल्या जाणाऱ्या कार्डसाठी अर्ज केला पाहिजे किंवा एकापेक्षा अधिक कार्ड्‌स सोबत ठेवली पाहिजेत. त्याशिवाय, तुमच्या कार्ड प्रोव्हायडरशी बोला आणि तुमच्या प्रवासाविषयी त्यांना माहिती द्या, ज्यामुळे तुम्ही परदेशात केलेला कार्डचा उपयोग संशयास्पद वाटणार नाही आणि तुमचे कार्ड ब्लॉक होणार नाही.

आंतरराष्ट्रीय व्यवहारांवरील प्रभार

तुमचे कार्ड परदेशात स्वाईप केल्यास तुम्हाला अतिरिक्त प्रभार भरावा लागू शकतो. प्रभाराचे तीन महत्त्वाचे प्रकार आहेत: परकीय चलन परिवर्तन शुल्क, परकीय व्यवहार प्रभार आणि रोख रक्कम शुल्क. परकीय चलन परिवर्तन शुल्कामध्ये तुमच्या कार्ड बॅलन्सचे रुपयांमधील रूपांतर संबंधित चलनात करण्यासाठी अंदाजे १-२ टक्के शुल्क समाविष्ट असते. परकीय व्यवहार प्रभार व्यवहाराच्या रकमेच्या २.५-३.५ टक्के एवढा तुम्हाला क्रेडिट कार्ड पुरविणाऱ्यांकडून कापून घेतला जातो. त्याशिवाय, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या आधारे पैसे काढण्यासाठी जेवढे मानक शुल्क भरीत असता, त्याव्यतिरिक्त १-४ टक्के शुल्क रोख रक्कम काढली म्हणून भरावे लागते.

तुमची खर्च करण्याची मर्यादा जाणून घ्या

तुम्ही ट्रीपवर जाण्यापूर्वी तुम्हाला तुमची खर्च करण्याची मर्यादा माहीत असलीच पाहिजे. परदेशवारी खर्चिक असते आणि तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात मोठे क्रेडिट लिमिट नसेल, तर तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा संपल्यानंतर तुमचा व्यवहार नाकारला जाऊ शकतो. तुमची सहल आनंदात जावी म्हणून तुमच्या क्रेडिट कार्डवरील मर्यादा वाढवून घ्या किंवा एकापेक्षा अधिक कार्ड्‌स सोबत बाळगा.

कार्ड प्रोटेक्शन प्लॅन घ्या

तुमच्या क्रेडिट कार्ड प्रोव्हायडरकडून प्रोटेक्शन प्लॅन घेऊन, फसवे व्यवहार, चोरी, गहाळ होणे, इत्यादी जोखमांपासून तुम्ही तुमच्या कार्डचे संरक्षण करू शकता. फक्त क्रेडिट कार्डच नव्हे, तर तुमचे डेबिट कार्ड आणि इतर कागदपत्रेही कार्ड प्रोटेक्शन प्लॅनच्या माध्यमातून संरक्षित करू शकता. सहलीला गेलेले असताना कार्ड हरवल्यास, सीपीपी तुम्हाला तुमच्या प्लॅनमध्ये हमी दिलेल्या रकमेएवढ्या पैशांची प्रवासात आणि हॉटेलखर्चासाठी आणीबाणीच्या प्रंसगीची मदत करू शकेल.

कार्डचा ग्राहकसेवा क्रमांक नेहमी हाताशी ठेवा

तुम्हाला ज्यांनी क्रेडिट कार्ड दिले त्यांचा तुम्हाला क्रेडिट कार्डसंबंधी काही अडचण आल्यास मदत करण्यासाठी समर्पित ग्राहकसेवा क्रमांक असतो. ज्यात कार्ड न सापडणे किंवा हरवणे किंवा खराब होणे याचा समावेश असतो. हा क्रमांक हाताशी ठेवा, ज्यामुळे तुम्ही तुमचे कार्ड ब्लॉक करू शकाल किंवा कार्ड हरवल्यास त्यासंबंधीची माहिती त्यांना तात्काळ कळवू शकाल. यामुळे तुम्हाला कोणत्याही गैरव्यवहारांपासून संरक्षण मिळेल.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार