महागाई सतत वाढत आहे. अजूनही आपण करोना महामारीमधून व्यवस्थित सावरलोही नाही आहोत, त्यातच रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगासमोर एक नवे आर्थिक संकट उभे झाले आहे. या सर्व घटनांमधून बोध घेऊन आपण आपल्या बचतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जितक्या लवकर आणि जितके जास्त पैसे बचत करता येतील तितके चांगले. कारण अडचणीच्या प्रसंगी आपण साठवलेले पैसेच आपल्या कामी येतात.
व्यावसायिक जगात पाऊल ठेवताच आपण आपल्या भविष्यासाठी नियोजन करायला सुरुवात करायला हवी. तुमचा पहिला पगार किंवा इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नापासूनच गुंतवणूक सुरू करणे शहाणपणाचे आहे. पण पहिली गुंतवणूक कुठे करावी आणि किती करावी याबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. प्रत्येकाला याबाबत शंका असतात. आज आपण जाणून घेऊया गुंतवणुकीची सुरुवात कुठून आणि कशी करावी.
विमा (इंश्युरन्स) :
तरुणांनी प्रथम विम्यावर भर द्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरोग्य विमा, जीवन विमा आणि मुदत योजना (टर्म प्लॅन) या तिन्ही विमा योजनांमध्ये गुंतवणूक करावी. विमा लवकर सुरू करण्याचा फायदा हा आहे की तो कमी प्रीमियममध्ये चांगले कव्हरेज देतो.
१ एप्रिलपासून बँकिंग, टॅक्सशी संबंधीत नियमांमध्ये होणार बदल; जाणून घ्या काय होणार परिणाम
म्युच्युअल फंड :
तुम्ही एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू करू शकता. एसआयपी लवकर सुरू केल्याने, आयुष्यातील एका टप्प्यावर तुमच्याकडे चांगली रक्कम जमा झालेली असेल. मिळकत वाढल्यास, SIP मधील गुंतवणूक देखील वाढवा.
पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) :
नोकरी सुरू होताच निवृत्तीचे नियोजनही सुरू केले पाहिजे आणि त्यासाठी सर्वोत्कृष्ट योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. यालाच पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) असेही म्हणतात. पीपीएफच्या माध्यमातून तुम्ही कमी वेळेत चांगला निधी गोळा करू शकता. तुम्हाला पीपीएफमधील गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभही मिळतो.
आवर्ती ठेव (Recurring Deposit) :
तुम्ही एसआयपी सारखे आरडी देखील सुरू करू शकता. रिकरिंग डिपॉझिटच्या मदतीने तुम्ही अल्प मुदतीच्या लक्ष्यांसाठी पैसे गोळा करू शकता. दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून एक निश्चित रक्कम कापून तुमच्या आरडी खात्यात जमा केली जाते. याद्वारे तुम्ही वार्षिक विम्याचा हप्ता किंवा इतर कोणतेही आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करू शकता.
फिक्स्ड डिपॉजिट (FD) :
मुदत ठेव हा देखील सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. तुम्ही कोणतीही जोखीम न घेता गुंतवणूक करू शकता. इतर योजनांच्या तुलनेत यामधील परतावा कमी असला तरी, अल्पकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
आपत्कालीन निधी :
आपत्कालीन निधी तयार करण्याचे सुनिश्चित करा आणि जितक्या लवकर तुम्ही ते सुरू कराल तितके चांगले. कारण आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. अशा परिस्थितीत आपत्कालीन निधी खूप उपयुक्त आहे. या फंडाचा फायदा असा आहे की तुम्हाला तुमच्या इतर बचत योजनांमध्ये छेडछाड करण्याची गरज नाही. आपत्कालीन निधी तुमच्या उत्पन्नाच्या किमान ६ महिन्यांच्या समान असावा.