चेहऱ्यावर स्मित हास्य, बोलण्यात कमालीची नम्रता असलेली या कॅफेतील माही तुमचं मन जिंकून घेते. आजवर तुम्ही एकाहून एक हटके सेवा देणारे कॅफे, रेस्तराँ पाहिले असतील. पण नवी मुंबईतल्या वाशी इथल्या ‘थर्ड आय कॅफे’ची गोष्टच निराळी आहे. या कॅफेमध्ये ट्रान्सजेंडर काम करतात. ही अनोखी कल्पना सुचली ती या कॅफेचे मालक निमेश शेट्टी यांना. कॅफेमधील एकूण २० कर्मचाऱ्यांपैकी सहा ट्रान्सजेंडर कर्मचारी आहेत. त्यापैकी एक किचनमध्ये, एक मॅनेजर तर ४ जण वेटर आहेत. या कॅफेत येणाऱ्या लोकांनीही या सकारात्मक बदलाचं स्वागत केलं आहे.

ट्रान्सजेंडरसाठी लोकांमध्ये असलेले पूर्वग्रह, काही समज यांमुळे त्यांना आदराने वागवलं जात नाही. पण या कॅफेमुळे त्यांच्या जगण्याचा एक नवा अर्थ मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही. इथं काम करताना त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतोच आहे, पण त्याचसोबत लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला विचारही बदलत आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून निमेश यांनी पुढाकार घेतला आणि ट्रान्सजेंडरना कॅफेमध्ये काम देण्याची अनोखी कल्पना त्यांनी अंमलात आणली.

या कॅफेतून तुम्हीसुद्धा एक सकारात्मक विचार घेऊनच बाहेर पडाल यात काही शंका नाही. तर मग कधी भेट देताय ‘थर्ड आय कॅफे’ला?

 

 

Story img Loader