हृदयरोग हा एक अतिशय जीवघेणा आजार आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की जास्त वजन, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब या समस्या बहुतांश लोकांमध्ये अधिक दिसून येतात. आजच्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना लहान वयातच हृदयाशी संबंधित आजार होऊ लागले आहेत.
मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण आणि लठ्ठपणा, प्रक्रिया केलेले तेलकट, खारट आणि हवाबंद डब्यातील अन्नपदार्थाचे सेवन हेही हृदयावर परिणाम करू शकते. घरातूनच ऑफिसचे काम यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. खूप जास्त काळासाठी एकाच जागी बसून राहणे अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते. यामुळेही हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.
सध्या प्रत्येकजण धकाधकीचे जीवन जगत आहेत. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखताना अनेकदा मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच करोना महामारीच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. परिणामी तणाव, चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. यासह जीवनशैलीतील बदल, व्यसनाधीनता, अपुरी झोप, पोषक आहाराची कमतरता या साऱ्या गोष्टी हृदयविकाराच्या समस्या वाढविण्यास कारणीभूत असतात.
हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पौष्टिक आहारासोबतच चांगली झोप घेणे देखील आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित आजारांशिवाय लठ्ठपणा आणि टाइप-२ मधुमेह यांचा धोका वाढू शकतो. अशा स्थितीत हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी झोपण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी चहा पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या
एका रिपोर्टनुसार, हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगली झोप घेणे खूप गरजेचे आहे. असे मानले जाते की रात्री १० ते ११ या वेळेत झोपणे चांगले असते. हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी झोपण्याची हीच योग्य वेळ आहे. एका संशोधनात, ४३ ते ७९ वयोगटातील ८८ हजारांहून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला होता. यादरम्यान, या लोकांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेची नोंद करून ठेवण्यात आली. याशिवाय त्यांच्या जीवनशैलीच्या आधारे त्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्याआधारे हा दावा करण्यात आला आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीकरिता तज्ञांशी संपर्क साधा.)