शाश्वत बागकाम पद्धतींचा अवलंब करून अनेक जण स्वत:ची सुंदर बाग तयार करीत आहेत. काही दिवसांपासून बाग फुलविण्यासाठी केळीची साल खत म्हणून वापरण्याचा ट्रेंड उदयास येत आहे. पौष्टिक स्नॅक म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या या केळ्यामध्ये फर्टिलायजेशनच्या दृष्टिकोनातून क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते.
एन्व्हायरोकेअर फाऊंडेशनचे सह-संस्थापक हृषित पँथ्री (Hrishit Panthry) म्हणतात, “केळीच्या सालीमध्ये भरपूर पोषक घटक असतात; ज्यांचा उपयोग खतांमध्ये करता येतो आणि त्यात पोटॅशियम, फॉस्फरस व कॅल्शियम यांचा समावेश होतो. हे पोषक घटक वनस्पतींच्या पुनरुत्पादक क्षमता आणि त्यांच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण कार्य करतात.”
Life’s Good Kitchen ने Instagram वर शेअर केलेली एक पोस्ट स्पष्ट करते की, हा हॅक गेम चेंजर का आहे. “केळीच्या साली पुन्हा वापरण्याचा कोणताही मार्ग नाही, असे वाटते? हे घरगुती केळीच्या सालीचे खत तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते”, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
‘वन अर्थ फाउंडेशन’चे संचालक व सह-संस्थापक फर्डिन सिल्व्हेस्टर यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, भारत हा जगातील सर्वोच्च केळी उत्पादक देश आहे. भारतातच केळीच्या सालीचा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. केळीच्या सालीचा खत म्हणून वापर करण्यामुळे आपल्या देशाला शाश्वततेची उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होईल आणि त्यामुळे चक्रीय अर्थव्यवस्थेला (सर्क्युलर इकॉनॉमी) चालना मिळेल. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होईल आणि स्थानिक समुदाय कचरा व्यवस्थापन आणि कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी सक्षमतेने काम करू शकतील.
केळीच्या सालीचा खत म्हणून वापर कसा करावा?
पारंपरिक खते ही तुमच्या झाडांची साखरेची पातळी झटपट वाढवू शकतात. ही प्रक्रिया अगदी जलद होते; पण अनेकदा तात्पुरत्या काळासाठी होते. ती जमिनीतील असंतुलनास कारणीभूत ठरू शकतात आणि फायदेशीर सूक्ष्म जीवांना हानी पोहोचवू शकतात. सिल्व्हेस्टर स्पष्ट करतात, “ते खत तत्काळ पोषक घटक वाढवितात; परंतु संभाव्यतः पोषक घटक त्वरित निघून जातात आणि पर्यावरणास हानी पोहोचवतात.”
हृषित सांगतात, “सामान्य खतांच्या विरुद्ध केळीच्या सालीचे खत तितकेच कार्यक्षम आणि पर्यावरणास अधिक अनुकूल असू शकते. कृत्रिम रसायने सहसा पारंपरिक खते बनवतात; जी पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात. केळीच्या सालीचा खत म्हणून वापर केल्याने प्रतिजैविक आणि रसायनांशिवाय बागकाम करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला प्रोत्साहन आणि समर्थन मिळते.”
केळीच्या सालीचे खत कसे तयार करावे?
एका प्लास्टिकच्या बादलीमध्ये केळीची सालीचे तुकडे टाका. त्यात साल बुडेल इतके पाणी ओता. तीन दिवस ते झाकून ठेवा. तीन दिवसांनी केळीच्या सालीचे पाणी वेगळे करून, त्यात पाण्याचे प्रमाण वाढवा. हे केळीच्या सालीचे पाणी तुम्ही झाडांसाठी खत म्हणून वापरू शकता.
पिकलेल्या केळीचे साल उन्हात वाळवून त्याची पावडर देखील तयार करू शकता. एका कुंडीला एक चमचा या प्रमाणात केळीच्या सालीची पावडर वापरू शकता. माती उकरून ही पावडर झाडांना देऊ शकता.
फुले व फळे दोन्ही झाडांसाठी फायदेशीर
सिल्व्हेस्टर यांनी नमूद केले आहे की, केळीच्या सालीचे खत फुले आणि फळे अशा दोन्ही झाडांसाठी फायदेशीर ठरू शकते. केळीच्या सालीतील पोटॅशियम फुलांच्या उत्पादनास प्रोत्साहन देते आणि त्याच सालीतील फॉस्फरस फळांच्या विकासास समर्थन देते.
हेही वाचा – सुर्यनमस्कार करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? जाणून घ्या योग्य वेळ आणि फायदे
खतवापरादरम्यानचा कालावधी किती असावा?
उत्तम उत्पादनासाठी केळीच्या सालीचे खत प्रत्येकी ४-६ आठवड्यांनी झाडांना टाकता येऊ शकते; पण वेगवेगळ्या वनस्पती आणि मातीच्या परिस्थितीसाठी वारंवारता भिन्न असू शकते, असे हृषित यांनी सुचवते.
सिल्व्हेस्टर पुढे म्हणतात, “झाडांवर दर २-४ आठवड्यांनी वापरण्याच्या दृष्टीने केळीच्या साली पाण्यात भिजवून, त्याचा चहा तयार करता येतो.”
ताज्या विरुद्ध वाळलेल्या केळीच्या साली
सिल्व्हेस्टर स्पष्ट करतात की, ताज्या केळीच्या साली हळूहळू विघटित होतात. कालांतराने त्यातील पोषक घटक बाहेर टाकतात. या पद्धतीचा एक तोटा म्हणजे तो कीटकांना आकर्षित करू शकतो. वाळलेल्या केळीच्या साली ताज्या सालींपेक्षा अधिक वेगाने विघटित होतात; ज्यामुळे झाडांद्वारे पोषक घटकांचे विघटन व त्यानंतर शोषण वाढते आणि ते खत म्हणून साठवणेदेखील सोपे होते.
हेही वाचा – सोयाबीन खाण्यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी खरोखर कमी होऊ शकते का?
पर्यावरणाच्या संवर्धनात योगदान
केळीची साल खत म्हणून टिकाऊ आणि कचरा कमी करण्याचा चांगला उपाय आहे, असे हृषित सांगतात.
सिल्व्हेस्टर सुचवितात की, त्यांचा वापर मुख्य प्रवाहातील व्यावसायिक स्तरावरील खते म्हणून केल्याने संसाधन-केंद्रित आणि संभाव्य प्रदूषणकारी पारंपरिक रासायनिक खतांची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
एकूणच सेंद्रिय आणि नैसर्गिक केळीच्या सालीपासून तयार केलेले खत मातीची रचना आणि पोषक घटक वाढवते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे नैसर्गिक सूक्ष्म जीव क्रियाकलाप (natural microbial activity) वाढवतात; ज्यामुळे निरोगी वनस्पती आणि दीर्घकालीन शाश्वत परिसंस्था (ecosystem) निर्माण होते.