भारतीयांसाठी चहा हे एक नुसतं पेय नसून ते त्यांचं प्रेम आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ… दिवसातील कोणत्याही वेळी चहा घेणार का असं विचारल्यानंतर ‘हो’ उत्तर देणारे आपल्यापैकी अनेकजण आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की या चहाचा शोध कसा लागला?
चहा हे ब्रिटिशांचं पेय मानलं जात असलं तरी तसं नाही. त्याचं मूळ प्राचीन चीनशी जोडलं जातं. असं सांगितलं जातं की ख्रिस्तपूर्व ३० वं शतक ते ख्रिस्तपूर्व २१ वं शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागला. ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये शेन नुंग हा तेव्हाचा सम्राट सत्तेवरून हाकलला गेला. त्याला दक्षिण चीनच्या दुर्गम भागात एकांतवासात ठेवलं गेलं. तो अतिशय कफल्लक अवस्थेत होता. एकदा तो एका झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पानं पडली. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला, चवही बदलली. सम्राटाला त्या पाण्यामुळे एकदम तरतरी आली. त्याला ती चवही इतकी आवडली की त्या काळात त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी प्यायचा सपाटाच लावला. त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या त्या परिसरात चहाच्या रोपांचा शोध घेतला. सातत्याने चहा प्यायल्याने त्याचा पोटदुखीचा आजार बरा झाला असा प्रचार करत तो देशभर फिरू लागला. त्यातून आजच्या चहाचा जन्म झाला असं मानलं जातं. नंतर चीनमधून चहाची लोकप्रियता जगभर पसरत गेली.
आणखी वाचा : ‘ब्लॅक टी’ प्या आणि हृदयाशी निगडीत अडचणी करा दूर
चहाच्या क्षेत्रातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली आणि भारतीयांना खऱ्या अर्थाने चहाचा परिचय झाला. असं असलं तरी भारतात चहा अगदीच माहीत नव्हता असं नाही. काही भागात त्याचा फक्त औषधी वापर होत होता इतकंच. ब्रिटिशांनी आसामच्या खोऱ्यात आणि दार्जिलिंगच्या डोंगरांमध्ये चहाची लागवड सुरू केली. १४ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर भारतात चहाचं उत्पादन जोर धरू लागलं. हळूहळू चीन इतकाच चहा भारतात तयार होऊ लागला. आज भारत चीननंतरचा म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे.