उन्हाळा सुरु होताच फळांचा राजा आंब्याची चाहुल लागते. बाजारात वेगवेगळ्या जातींचे आंबे दाखल होतात. स्वादिष्ट आंब्याची चव चाखायला सर्वांना आवडते, हे चवदार, चविष्ट फळ वर्षातून एकदा खायला मिळतो. त्यामुळे कितीही महाग असले तरी घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. आंबा या फळाच्या विविध जाती असतात. ज्यावरून त्या आंब्याची ओळख ठरते. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, आंब्याच्या एकाच झाडावर १४ वेगवेगळ्या जातीचे आंबे उगवले आहेत, नाही ना. पण गुजरातमधील एका व्यक्तीने हे शक्य केलं आहे.
गुजरामधील धारी तालुक्यातील डितला गावातील केसर आंबा शेतकरी उकाभाई भाटी यांनी एकाच झाडावर १४ जातींचे आंबे पिकवण्याचा करिष्मा केला आहे. भाटी यांनी ७० च्या दशकातील आंब्याच्या विविध जाती त्यांनी एकाच आंब्याच्या झाडावर पिकवल्या आहेत. या झाडाच्या सर्व फांद्यांवर १४ विविध जातीचे आंबे उगवले जातात.
आंब्याच्या सेवनामुळे त्वचेला होतो ‘हा’ जबरदस्त फायदा, फक्त ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, ऐका डॉक्टरांचा सल्ला
भाटी हे मुळात केसर आंबे पिकवतात. पण त्यांच्या घराबाहेरील बागेतआंब्याचे असे एक झाड आहे ज्याच्या फांद्यांवर वेगवेगळ्या १४ जातींचे आंबे उगवतात. या दुर्मिळ झाडाला फळांचा उत्सव म्हटले जाते. कारण त्यावर होळीपासून दिवाळीपर्यंत आंबे येतात. पण भाटी या जादुई झाडात आणखी विविधता आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
भाटी यांनी जुनागढच्या नवाब काळात लागवड केलेल्या जातींसह या झाडाची लागवड केली आहे. ज्यात नलियेरो, गुलाबीयो, सिंदोरीयो, दादमो, कालो जमादार, कॅप्टन, पायलट, वरियालियो, बदाम, सरदार, श्रावणीयो, आषाढियो यांसारख्या जातींचा समावेश आहे. नवाबांच्या काळात आंब्याच्या २०० पेक्षा जास्त जाती होत्या. पण त्यातील केसर हीच जात आजपर्यंत टिकून आहे आणि तितकीच लोकप्रिय आहे, असे भाटी यांनी सांगितले.
यानंतर आंब्याच्या अनेक जातींना वैशिष्ट्यांना अनुरूप असे नाव दिले आहे. आमच्या प्रदेशातील आंब्यांच्या समृद्ध जातींबद्दल लोकांना माहिती व्हावी आणि आमच्या पुढच्या पिढीलाही ती समजावी यासाठी हे झाडं निर्माण करण्यात आले आहे.
भाटी हे या आंब्यांच्या झाडावरील आंबे विकत नाहीत, कारण या झाडावरून प्रत्येक जातीचे फक्त काही किलोच उत्पादन मिळते. त्यामुळे हे आंबे फक्त कुटुंबातील व्यक्तींनाच खाण्यासाठी ठेवले जातात असे भाटी सांगतात. भाटी पुढे सांगतात की, त्यांच्याकडे चार दशकांपूर्वी ४४ जाती असलेले एक झाड होते, परंतु ते नैसर्गिक कारणामुळे मरण पावले.
या झाडाबाबत भाटी सांगतात की, त्यांनी एका पुस्तकात वाचले होते, ज्यामध्ये त्यांना आंब्याच्या काही देशी जातींची नावे सापडली जी आता नामशेष होत आहेत. यानंतर त्यांनी महाराष्ट्र, राजस्थानमधील कृषी विद्यापिठ आणि डांगच्या वनक्षेत्रासह देशातील विविध भागांमध्ये या जातींचा शोध घेतला. यातील काही आंब्यांच्या जाती सापडल्या, परंतु काहींची नावे माहीत नव्हती त्यामुळे त्या सापडण्यात अडचणी आल्या.
भाटी यांच्या मते, या झाडाची सौंदर्यता म्हणजे यातील प्रत्येक जात वेगवेगळ्या वेळी फळ देते, काही जातींच्या फळांचा हंगाम लवकर सुरु होतो, तर काहींची उशिरा सुरु होतो. त्यामुळे हे झाड होळीपासून दिवाळीपर्यंत फळ देत राहते. गुजरातमधील गीर प्रदेश हे केसर आंब्याचे केंद्र मानले जाते. जुनागढ, अमरेली, गीर सोमनाथ आणि भावनगर जिल्ह्यात पसरलेल्या केसर फार्म, ज्यांना GI टॅग देखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथील आंब्याच्या गोड चवीने जगभरातील अनेक आंबा प्रेमींचे मन तृप्त केले आहे.