महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या टिक टॉकचा बोलबाला आहे. टिक टॉकचा व्हिडियो बनवणारा एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात असून त्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. फेसबुक, व्हाट्सअॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपनंतर आता सर्वांना टिक टॉकचे वेड लागले आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच याचे वेड लागले आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणात करणे योग्य मात्र त्याचा अतिरेक झाला की धोका उद्भवण्याची शक्यता असेत. त्याचप्रमाणे तुम्हाला या टिक टॉकचे व्यसन जडले असेल तर तुम्ही त्वरीत मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याबाबत बोलताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयदीप पाटील म्हणाले, मनोरंजन म्हणून अशा प्रकारची अॅप्लिकेशन्स वापरणे ठिक आहे. पण त्याचा अतिरेक वाईट असतो.
फेसबुक किंवा टिक टॉक अॅपवरील लाईक्स आणि कॅमेन्टस हे तुमचे आयुष्य यशस्वी असल्याचे ठरवू शकत नाहीत. हे आभासी जग असून त्याच्याकडे मनोरंजन म्हणून पाहायला हवे असा सल्लाही पाटील यांनी दिला. अतिरेक झाल्यास काय होऊ शकते याचे उदाहरण काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळालं आहे. काही तरुण सार्वजनिक रस्त्यावर टिक टॉकवर विडिओ बनवत असताना त्यांना पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर पोलीस आयुक्त आर.के पद्मनाभन यांनी टिक टॉक अॅपवर आक्षेपार्ह काही आढळल्यास थेट कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर शहरातील तरुणांनी काही प्रमाणात धसका घेत सार्वजनिक ठिकाणी व्हिडियो करणे बंद केले होते.
दरम्यान नोव्हेंबर महिन्यात चिखली परिसरात पैसे न दिल्याने टिक टॉकचा वापर करुन व्हिडियो काढून पतीला कर्करोग असल्याची बदनामी करत मानसिक त्रास पत्नीने दिला होता. या सततच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हे व्हिडियो काढणाऱ्यांबरोबरच ते बघणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. अशाप्रकारे आभासी जगात जगणे हा तरुणाईचा ट्रेंड झाला आहे. जे आपण स्वतः करू शकत नाही ते मिळवण्याचं साधन हे अॅप्लिकेशन असल्याने हे अॅप हवंहवंस वाटतं असे डॉ. पाटील म्हणाले. अशाप्रकारे आनंद मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊन तुम्हाला त्याची सवय लागू शकते. यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर याचे व्यसन लागू शकते. जी व्यक्ती स्वतःचा मुद्दा मांडू शकत नाही ते याद्वारे लपण्याच्या प्रयत्न करत आहेत. पण हे केवळ आभासी जग आहे त्याचा अतिरेक होत असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.