स्वयंपाक करताना तेल, तूप, भाज्यांची ग्रेव्ही, दूध, चहा यासारख्या गोष्टींमुळे गॅस शेगडीवर चिकट, तेलकट डाग पडतात. यामुळे केवळ गॅस बर्नरच नाही तर संपूर्ण गॅसची शेगडी घाण होते. अशावेळी गॅस शेगडी साफ करणे अत्यंत अवघड होऊन बसते. यामुळे गॅस बर्नर नीट जळत नाही आणि तुमचा गॅस आणि वेळ दोन्ही वाया जाते. अशा परिस्थितीत अनेक वेळा इच्छा नसतानाही भरपूर पैसे खर्च करुन गॅस शेगडी दुरुस्त करुन घ्यावी लागते.
यामुळे गॅस शेगडी स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स आपण आज जाणून घेणार आहोत. या टिप्स सेलिब्रिटी शेफ पंकज भदोरिया यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत.
गॅस शेगडी साफ करण्याच्या सोप्या पद्धती
गॅस शेगडीवर साचलेली घाण आणि चिकटपणा साफ करण्यासाठी प्रथम एका भांड्यात बेकिंग सोडा घ्या. यानंतर बेकिंग सोडामध्ये व्हाईट व्हिनेगर मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट गॅस बर्नरच्या भोवती लावून चांगली पसरवा. त्यानंतर ही पेस्ट गॅसच्या शेगडीवरही लावून सुमारे वीस मिनिटे तशीच राहू द्या. यानंतर, एक स्क्रब पॅड घ्या आणि गॅस बर्नर आणि त्याच्या सभोवतालची जागा घासून घ्या आणि काही वेळ पुन्हा ते असेच राहू द्या.
यानंतर दहा मिनिटांनी एक सुती ओला कपडा किंवा मॅजिक वाइब घ्या आणि गॅस शेगडी पूर्णपणे घासून पुसून टाका. तुमची गॅस शेगडी नवीन असल्याप्रमाणे चमकेल, तसेच गॅस बर्नरही नीट पेटू लागतील. पण गॅस शेगडीच्या कोणत्याही पाइपमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या.