आजकाल लोकांचे जीवन अतिशय धकाधकीचे आणि तणावपूर्ण झाले आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे. यामध्ये मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, तसेच नैराश्य अशा गंभीर आजारांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे गंभीर आजार केवळ वयस्कर लोकांनाच होतात असे नाही, तर अगदी तरुण आणि तंदुरुस्त लोकही या आजारांच्या विळख्यात येत आहे आणि याला कारणीभूत आहे बदललेली जीवनशैली.
आपल्या देशात, आजारी पडल्यावरच लोक डॉक्टरकडे जातात. पण जर आपण आपली नियमित तपासणी वेळोवेळी करत राहिलो, तर गंभीर आजारांचा धोका टाळता येईल. यामुळे रोग लवकर शोधात येतो आणि त्यावर उपचार करणे सोपे होते. आज आपण अशाच पाच रुटीन हेल्थ चेकअप्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वेळोवेळी केल्या पाहिजेत.
- मधुमेह चाचणी
कुटुंबात एखाद्या सदस्याला आधीपासूनच मधुमेह असल्यास आणि लठ्ठपणामुळे उच्च रक्तशर्करेची समस्या होऊ शकते. जसजसे तुमचे वय वाढते तसतसा त्याचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत वेळोवेळी रक्तातील साखर तपासत राहा. विशेषत: वयाच्या ३० वर्षांनंतर विशेष काळजी घ्यावी. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने हृदयाच्या समस्या, किडनी, डोळे आणि न्यूरोलॉजिकल समस्याही उद्भवू शकतात.
- लिपिड प्रोफाइल
३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये हृदयविकाराची शक्यता वाढते. विशेषत: आजकालची व्यस्त जीवनशैली आणि वाढलेला तणाव, यामुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी वेळोवेळी लिपिड प्रोफाइल करत राहा, यामुळे तुम्हाला शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण लक्षात येईल आणि समस्या वाढण्याआधीच त्यावर उपचार करता येतील.
आहारातील चवळीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक गंभीर आजारांवर आहे प्रभावी
- ब्लड प्रेशर
रक्तदाबाची समस्या पाहिल्यास फारशी धोकादायक वाटत नसली, तरीही विज्ञानाच्या भाषेत याला सायलेंट किलर मानला जाते. कारण रक्तदाबाच्या अनियमिततेमुळे मधुमेह, हृदयविकार, किडनीचा त्रास होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे वेळोवेळी रक्तदाब तपासत राहा.
- प्रोस्टेट स्पेसिफिक एंटीजेन (PSA)
प्रोस्टेट कर्करोग हा भारतातील शीर्ष १० कर्करोगांपैकी एक आहे. पुरुषांमध्ये प्रोस्टेटची समस्या अधिक आढळते. अशा परिस्थितीत पीएसए चाचणी वेळोवेळी करावी. ही रक्त तपासणी असून त्याचा अहवाल एका दिवसात प्राप्त होतो. ज्यांचा या आजारचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांनी वयाच्या चाळीशीनंतर विशेष काळजी घ्यावी.
- TSH (थायरॉईड उत्तेजक संप्रेरक)
थायरॉईड संप्रेरक हे आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म आणि एकूणच ऊर्जा, मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. थायरॉईड संप्रेरकांच्या स्रावात व्यत्यय आल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत वेळोवेळी थायरॉईडची तपासणी करून घ्यावी.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)