Tips For Keeping House Helper In Home: गेल्या काही वर्षांत मोठ-मोठ्या शहरांमध्ये घरकामासाठी मदतनीस ठेवण्याची संख्या झपाट्याने वाढतेय. विशेषत: ज्या घरांमध्ये पती पत्नी दोघेही ऑफिसला जात असतील अशा घरांत घरकाम, स्वयंपाक कामासाठी मदतनीस ठेवली जाते. जी सकाळच्या डब्यापासून ते घरातील कपडे, भांडी घासण्यापर्यंत सर्व कामं करते. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांत तुम्हाला ही संस्कृती पाहायला मिळेल. लोक या मदतनीसेवर दिवसभर सर्व घर, मुलांची जबाबदारी सोपवून निवांतपणे कामावर जातात. पण, घरात मदतनीस ठेवण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे आणि सावध राहणे गरजेचे आहे. जर तुमच्या घरात मदतनीस किंवा केअर टेकर ठेवली किंवा ठेवत असाल तर तिच्याबद्दल तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.
घरकामासाठी मोलकरीण, मदतनीस ठेवण्यापूर्वी घ्या ‘या’ गोष्टींची काळजी
१) पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्या :
कोणतीही मोलकरीण किंवा मदतनीस कामावर ठेवण्यापूर्वी तिचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्या. ती मूळची कुठली आहे किंवा तिचे कुटुंब आणि पत्ता याविषयी संपूर्ण माहिती असणे महत्त्वाचे आहे.
२) आधार कार्ड आणि कायमस्वरूपी निवासस्थानाचा पत्ता घ्या :
तुम्ही ज्यांना तुमच्या घरात कामावर ठेवत आहात, त्यांच्या कायम वास्तव्याच्या कोणत्याही पुराव्याची प्रत मागून घ्या. आधार कार्डची प्रत घ्या. फोन नंबर आणि स्थानिक पत्तादेखील जाणून घ्या.
३) घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा :
आजकाल सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा आहे, म्हणून तुम्ही घरात मोलकरीण किंवा मदतनीस ठेवता तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा जरूर लावा. याद्वारे तुम्ही तिच्या दैनंदिन कामांवर लक्ष ठेवू शकता. असे कॅमेरेदेखील आहेत, जे तुम्ही बंद करून ठेवू शकता.
४) मौल्यवान वस्तू लॉक करून ठेवा :
जर तुम्ही घरात रोख रक्कम किंवा दागिने ठेवत असाल तर लॉकरमध्ये ठेवा. तुमच्या महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तू कपाटात बंद करून ठेवा, त्यामुळे कोणतीही घटना घडण्याची शक्यता कमी होते.
५) वेबसाइट, संस्थेविषयी माहिती घ्या :
जर तुम्ही कोणत्याही वेबसाइट किंवा संस्थेद्वारे मोलकरीण किंवा मदतनीस कामावर ठेवत असाल तर त्या साइटबद्दल संपूर्ण माहिती मिळवा. अनेक वेळा बनावट साइट तयार करून फसवणूक केली जाते. कोणत्याही अनोंदणीकृत संस्था किंवा कंपनीकडून मदतनीस घरकामासाठी ठेवू नका.
६) घरात इतर कोणाला येऊ देऊ नका :
जर मदतनीस किंवा मोलकरीण तिच्या ओळखीच्या व्यक्तीला आपला नातेवाईक असल्याचे सांगून तुमच्या घरी आणत असेल तर चुकूनही त्यांना घरात घेऊ नका. याला परवानगी दिल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. या निमित्तानं काही घटना घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
७) घराच्या चाव्या देऊ नका :
बरेचदा लोक घराच्या चाव्या मोलकरणीला किंवा मदतनीसकडे देतात. चुकूनही असे करू नका, यामुळे तुमच्या घरात चोरीची शक्यता वाढते. मदतनीस किंवा मोलकरणीसमोर कधीही कपाट उघडू नका आणि मौल्यवान वस्तू नजरेसमोर ठेवू नका.
(यातून कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही, परंतु आपल्या घराच्या सुरक्षेसाठी काही बेसिक गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.)