How To Big Salary Job: अक्षता, तुमच्या आमच्यासारखीच एक सामान्य घरातील मुलगी. ग्रॅज्युएशन संपताच तिने कॉलेजमध्ये झालेल्या प्लेसमेंटमधून स्वतःसाठी जॉब मिळवला होता. सुरुवातीला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कामावर रुजू झालेल्या अक्षताने काहीच आठवड्यांमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवलं. वर्षभराने तिचं काम आणि पद वाढवण्यात आला, नाही म्हणायला काही प्रमाणात पगारही वाढला. पण मग त्याच त्याच कामात अक्षताचं मन लागत नव्हतं, शिवाय कामाच्या तुलनेत पगारही खूप कमी मिळत होता. ऑफिसमध्ये रुळायला लागल्यानंतर मित्र- मैत्रिणीच नाही तर उगाच कारस्थान करणारी लोकंही भेटू लागली. अशावेळी तिला काम करण्याची साहजिकच इच्छा होत नव्हती म्हणून तिने जॉब शोधायला सुरुवात केली.
चार ठिकाणी सीव्ही पाठवल्यावर एकीकडून इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आलं. तिथे गेल्यावर सुद्धा नेहमीप्रमाणे तिला अनुभव विचारण्यात आला. मग एक दोन प्रश्न झाले आणि मग त्या मुलखात घेणाऱ्या व्यक्तीने तिला “तूला आधीचा जॉब का सोडायचाय” असा प्रश्न केला.
तुमच्याही बाबत असा प्रकार घडला असेल, म्हणजे साधारण जॉबसाठी इंटरव्ह्यूला गेल्यावर असे काही सामान्य प्रश्न विचारले जातात. यावेळी अनेकजण गोंधळून जातात. प्रामाणिक उत्तर देणं हेच योग्य असलं तरी “मला पगारच वाढवून मिळत नाही”, “ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे,” “मला माझा बॉस आवडत नाही” अशी उत्तर देणं म्हणजे तुमचंच नुकसान होऊ शकतं. हे टाळण्यासाठी काही जण आधीच्या कंपनीचं आणि नव्या कंपनीत जिथे रुजू व्हायचंय त्यांचं कौतुक करायला लागतात. पण खरं सांगायचं तर इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती अशा उत्तरांकडे कधीच आकर्षित होत नाही. कारण तुमच्या आधी आणि कदाचित नंतरही येणारी अनेक लोकं त्यांना हीच उत्तरे देत असतात. मग अशावेळी काय उत्तर द्यावं यासाठी अक्षताचं उदाहरण पुढे बघूया.
अक्षता म्हणाली की, ” मला आधीच्या कंपनीत अमुक अमुक रोल देण्यात आला होता, जो माझ्या अनुभव व शिक्षणानुसार योग्य होता, पण त्यानंतर मी अनेक गोष्टी शिकत आले आहे. जॉब करताना मिळणारा अनुभव व त्याशिवाय इतरही कोर्स करून मी माझं प्रोफाइल तयार केलं आहे. मी आधीच्या कंपनीत माझ्याकडून अपेक्षित कामांसह (XYZ) इतरही गोष्टी आवड व शिकण्याच्या हेतूने केल्या आहेत, हे करताना मी माझ्या पदावरून जे काही मिळवू इच्छित होते ते मी मिळवलं आहे आणि आता मला माझं कार्यक्षेत्र रुंदावायचं आहे. त्यासाठी तुम्ही करत असलेला (अमुक अमुक) प्रोजेक्ट योग्य माध्यम ठरू शकतो.म्हणून मला आधीचा जॉब सोडायचा आहे. माझं प्रोफाइल पाहून त्यानुसार साजेसा पगार सुद्धा इथे ऑफर करण्यात येईल अशी मला खात्री आहे”
या उत्तरातून तुम्ही शिकू शकता अशा तीन मुख्य गोष्टी म्हणजे
१) तुम्हाला आधीच्या कंपनीबाबत वाईट बोलायची गरज नाही. उलट तुम्ही तिथे असताना कोणत्या गोष्टी केल्यात यावर अधिक जोर द्या.
२) तुम्ही त्यानंतर स्वतःला मोठ्या पदावर घेऊन जाण्यासाठी काय बदल केले आहेत याविषयी बोला.
३) तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मुलाखत देत असणाऱ्या कंपनीविषयी काय अभ्यास केला आहे हे समोरच्याला दिसू द्या.
एक बोनस टीप म्हणजे पगाराचा मुद्दा संभाषणात अगदी सहज येऊ द्या जेणेकरून तुमच्या पगारवाढीबाबतच्या अपेक्षा सुद्धा स्पष्ट होतील. तुम्हाला या टिप्सची मदत होतेय का व अशाच नवनवीन टिप्स वाचायला आवडतील का हे कमेंट करून नक्की कळवा.