आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काही ठराविक जबाबदाऱ्या सांभाळत असतो. तारुण्याचा सोनेरी काळ संपत येतो आणि मग करिअरची आणि आर्थिक गोष्टींची चिंता सुरु होते. महिन्याकाठी नोकरीतून किंवा व्यवसायातून येणारे उत्पन्न, त्यामधून होणारा दैनंदिन खर्च आणि त्यातून भविष्यासाठी आपण करत असलेली बचत यांचे गणित आपण जवळपास जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत सोडवत असतो. यामध्ये जागेत किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे, कर्ज घेणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. याबाबत मागच्या काही काळात जागरुकता वाढल्याने अनेकांचे निर्णय बरोबर असतातही. पण काहींना या सगळ्या गोष्टींबाबत पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे निर्णय चुकू शकतात. सुरुवातीला या चुकांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र या चुका वेळीच लक्षात आल्या तर आपण त्यावर योग्य तो मार्ग काढून भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी टाळू शकतो. आता अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याकडून अगदी सहज होऊ शकतात.
१. गुंतवणूक आणि विमा यांच्यात गोंधळ करणे : विमा आणि गुंतवणूक याबाबत आपल्याला योग्य ती माहिती असणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींचा उद्देश सारखा नसतो, त्यामुळे एकाला दुसऱ्याच्या जागी ठेवता येणार नाही. विम्याचा उद्देश तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणीच्या वेळी मदत करणे असा असतो. तर गुंतवणुकीचा एकमेव उद्देश संपत्ती निर्माण करणे असा असतो.
२. गुंतवणूक उशीरा सुरू करणे : बरेच लोक गुंतवणूक सुरू करण्यात चालढकल करतात. आपण बहुधा खर्चाची तरतूद आधी करतो आणि बचतीच्या बाबतीत ‘पुढे पाहू’ असे म्हणतो. पण गुंतवणूक उशीरा सुरू केल्याने तुमचा त्यावरील फायदा मर्यादित राहतो आणि त्याने तुम्हाला चक्रवाढीचा पूर्ण लाभ मिळत नाही. अशाने रिटायरमेंट जवळ आलेली असताना तुम्हाला अर्थिक अडचणी भेडसावू शकतात. गुंतवणूक लवकर सुरु केल्याने तुम्हाला गुंतवणुकीचे विविध प्रकार करून पाहाता येतात. कारण त्यावेळी तुमच्याकडे भरपूर वेळ असतो आणि जोखीम पत्करण्याची क्षमतासुद्धा अधिक असते.
आयडीया प्रीपेड ग्राहकांसाठी खूशखबर
३. अविचारी कर्ज घेत सुटणे : वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड घेणे अगदी सोपे असल्यामुळे बरेचदा लोक विचार न करताकर्ज घेतात. कर्जाची परतफेड तुमची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी असते. त्यामुळे कर्ज तेवढेच घ्यावे जेवढे तुम्ही तुमच्या नियमित उत्पन्नातून सहज फेडू शकता. त्यासाठी एक मापदंड म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या ३० ते ४० टक्क्यांपर्यंतच तुमच्या कर्जाचे हप्ते असायला हवेत. यापेक्षा अधिक कर्ज काढल्यास तुम्हाला त्याची परतफेड करणे कठीण होऊ शकते.
४. कर्ज पूर्ण न करता गुंतवणूक सुरू करणे : कर्ज आणि इतर देणी पूर्ण केल्याशिवाय चांगली गुंतवणूक करणे कठीण असते. बरेचदा तुमच्यापाशी पैसे शिल्लक असतात, तेव्हा तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की याचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी करावा की अधिक परतावा मिळण्यासाठी गुंतवणूक करावी. या निर्णयासाठी सांगोपांग विचार करणे आवश्यक असते. अशा प्रकारचे निर्णय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, विचारप्रक्रिया यामध्ये फरक असतो.
५. नियम बारकाईने न वाचणे : कर्ज घेण्यापूर्वी, विमा उतरण्यापूर्वी किंवा इतर कुठला आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्यासंबंधी सर्व अटी वाचून घेणे आवश्यक असते. अनेकांना ही मोठी डोकेदुखी वाटू शकते, पण तसे करणे गरजेचे असते. हे सगळे योग्य पद्धतीने वाचून मगच योग्य तो निर्णय घ्यावा. अटी काळजीपूर्वक वाचल्याने त्या वस्तूसंबंधी समज वाढते आणि लहान-सहान तपशील कळल्याने निर्णय घेण्यास मदत होते. त्यामुळे अशाबाबतीत केवळ एजंटच्या किंवा विक्रेत्याने सांगितलेल्या गोष्टींवर अवलंबून राहू नये. त्याबाबत आणखी ४ ठिकाणाहून, व्यक्तींकडून माहिती घेऊन मगच निर्णय घ्यावा.
गुगलचे ‘तेज’ पेमेंट अॅप लवकरच तुमच्या मोबाईलमध्ये!
६. स्टेटमेंट्स आणि हिशोब न ठेवणे : बँकांचे स्टेटमेंट्स आणि इतर आर्थिक रेकॉर्ड्स सांभाळून ठेवावेत. कारण रिटर्न भरण्यासाठी किंवा एखाद्या वित्तीय संस्थेशी वाद निर्माण झाल्यावर त्याचे निराकरण करण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी ही कागदपत्रे लागू शकतात. हे स्टेटमेंट्स नीट वाचलेले असल्यास तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्स, गुंतवणुकीवरील उत्पन्न, खर्च इत्यादी कळतात आणि तुमचा वैयक्तिक तपशील (जन्म दिनांक, पत्ता व इतर ) बरोबर आहे की नाही तेही पाहता येते.
७. क्षमतेपेक्षा अधिक खर्च करणे : क्षमतेपेक्षा अधिक खर्च केल्याने तुमचे बजेट बिघडू शकते. आधी खर्च करून मग बचत करणारे लोक बहुधा बचत आणि गुंतवणूकीत मागे असतात. परिणामी आर्थिक संकटाच्या वेळी किंवा वैद्यकीय सुविधा घेण्याची आवश्यकता असल्यास त्यांची तयारी कमी पडते. त्यामुळे संभाव्य घटना लक्षात घेऊन तरतूद करून ठेवणे महत्वाचे असते. त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातूनच इतर खर्च केला तरीही हरकत नाही.
आदिल शेट्टी,
सीईओ, बॅंकबझार