Tips To Make Your Perfume Smell Last Longer : कुठेही तयार होऊन जाताना परफ्यूम मारल्याशिवाय तयारी अपूर्णच वाटते. कारण- आजकाल परफ्यूमचा वापर करणं स्टाईल स्टेटमेंट झालं आहे. पर्सनॅलिटी आकर्षक वाटण्यासाठी आणि घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आज सगळेच परफ्यूमचा भरपूर वापर करता. परफ्यूम लावल्याने शरीराला चांगला सुगंध येतो. चांगला वास मूडसुद्धा फ्रेश ठेवतो. म्हणून आपण संपूर्ण कपड्यांवर पाहिजे तितका परफ्यूम स्प्रे करतो. पण, काही जणांचा परफ्यूम भरपूर काळ टिकतो; तर काही जणांचा सुगंध अगदी एक ते दोन तासांत नाहीसा होतो. तर आज आपण या बातमीतून परफ्यूम दीर्घकाळ कसा टिकेल याच्याबद्दलच्या टिप्स जाणून घेणार आहोत…

आता हळूहळू उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घाम आणि आर्द्रतेमुळे शरीराचा सुगंध लवकर कमी होतो. महागडे परफ्यूमदेखील बऱ्याचदा जास्त काळ टिकत नाहीत, ज्यामुळे लोकांना प्रत्येक वेळी नवीन परफ्यूम खरेदी करावे लागतात. पण, आता तुम्हाला असे करण्याची काहीच गरज नाही.

परफ्यूम जास्त काळ टिकविण्यासाठी टिप्स (How To Make Long Lasting Perfume) :

१. तुमच्या त्वचेला चांगले मॉइश्चराइझ करा : जर तुम्हाला तुमचा परफ्यूम जास्त काळ टिकवायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या त्वचेला चांगले मॉइश्चराइझ करावे लागेल. त्यामुळे सुगंध जास्त काळ टिकतो.

२. समान सुगंध असलेले बॉडी लोशन वापरा : तुम्ही वापरत असलेल्या परफ्यूमसारखा सुगंध असलेले बॉडी लोशन, साबण किंवा बॉडी मिस्ट वापरल्याने सुगंध जास्त काळ टिकतो. अंघोळीनंतर जेव्हा तुम्ही हे वापरता तेव्हा तुमच्या शरीराला एक छान सुगंध येतो, जो दिवसभर टिकून राहण्यास मदत करतो.

३. अंघोळीनंतर लगेच परफ्यूम लावा : अंघोळीनंतर लगेच त्वचेवर परफ्यूम लावल्याने त्याचा सुगंध जास्त काळ टिकतो. अंघोळीनंतर लगेच परफ्यूम लावल्याने तुमच्या त्वचेवर धूळ आणि घाण राहत नाही, ज्यामुळे परफ्यूमचा प्रभाव जास्त काळ टिकतो.

४. योग्य ठिकाणी परफ्यूम लावा : तुमच्या शरीराच्या काही भागांवर परफ्यूम लावल्याने सुगंध जास्त काळ टिकतो. कान, मनगटे, नाभी यांच्याजवळ, गुडघ्यांच्या मागे व मानेभोवती परफ्यूम लावल्याने सुगंध जास्त काळ टिकतो. पुरुष त्यांच्या शर्टच्या कॉलरवर परफ्यूम स्प्रे करू शकतात; जेणेकरून वास जास्त काळ टिकेल.

५. हलक्या हाताने परफ्यूम स्प्रे करा : जेव्हा तुम्ही परफ्यूम स्प्रे करता तेव्हा हलक्या हाताने स्प्रे करा; जेणेकरून त्याचा प्रभाव जास्त काळ टिकेल. परफ्यूमच्या योग्य वापरामुळे त्याचा सुगंध बराच काळ तुमच्याबरोबर राहील.