Top 5 Cheapest Markets in Pune for Diwali Shopping : येत्या काही दिवसांवर दिवाळी आहे. सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. खरेदीसाठी बाजारपेठा सुद्धा सजल्या आहेत. लोक खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करताहेत. फटाके, मिठाई, फराळ, कपडे, दिवे, पाहुण्यांना देण्यासाठी भेटवस्तू किंवा कपडे तसेच घर सजावटीसाठी साहित्य इत्यादी अनेक गोष्टींची खरेदी लोक उत्साहाने करतात.
तुम्ही जर पुणे किंवा पुण्याच्या जवळच्या गाव शहरातील रहिवासी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यातील स्वस्तात मस्त अशी काही प्रसिद्ध मार्केटविषयी तुम्हाला सांगणार आहोत. पुण्यातील शॉपिंग स्ट्रीट्स एकापेक्षा एक दर्जेदार कलेक्शन आणि स्वस्त किमतीसाठी ओळखले जाते. पुण्यातील या मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कपड्यांपासून कॉस्मेटिकपर्यंत, ज्वेलरीपासून घरगुती रंग सजावटीपर्यंत कमी किमतीत सर्व खरेदी करता येऊ शकते.
फॅशन स्ट्रीट
फॅशन स्ट्रीट हे स्ट्रीट शॉपिंगसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण फॅशनेबल कपड्यांसाठी ओळखले जाते. पुण्यातील या फॅशन स्ट्रीटवर तुम्हाला इंडियन आणि वेस्टर्न ड्रेस खूप कमी किमतींमध्ये मिळू शकतात. कुर्ती, जीन्स, दागिने, चप्पल, टॉप्स, नाईट वेअर, सौंदर्य प्रसाधने अशा सर्वच वस्तू तुम्हाला कमी किंमतीत येथे मिळेल. या मार्केटमध्ये विक्रेत्यांचे जवळपास ४०० स्टॉल्स आहेत.
ठिकाण – भवानी पेठ, शोभापूर, कसबा पेठ, पुणे
जुना बाजार
जर तुम्हाला दिवाळीमध्ये घर सजवायचे असेल, तर तुम्ही जुना बाजारमध्ये जा. या बाजारात तुम्हाला ट्रेंडी अँटिक वस्तू खरेदी करता येतील. स्वस्तात वस्तू खरेदीसाठी हे बेस्ट मार्केट आहे. येथे एकापेक्षा एक दर्जेदार पद्धतीची ज्वेलरीसुद्धा मिळते. यंदा दिवाळीत तुम्ही प्राचीन वस्तू्ंनी घराला एक वेगळा लूक देऊ शकता.
ठिकाण – वीर संताजी घोरपडे रोड, कसबा पेठ पुणे
हाँगकाँग लेन
हाँगकाँग लेन ही डेक्कन रोडवरील सर्वात लोकप्रिय रस्ता आहे. येथे तुम्हाला दिवाळीच्या खरेदीसाठी कपडे, दिवे फूटवेअर, हँडबॅग, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती वस्तू खूप कमी किमतीत मिळू शकतात. वस्तूंच्या कमी किमतींमुळे हे मार्केट महाराष्ट्रभरात फेमस आहे. त्यामुळे यंदा दिवाळीची खरेदी करताना या मार्केटला अवश्य भेट द्या.
ठिकाण – हाँगकाँग लेन, डेक्कन जिमखाना, पुणे
हेही वाचा : Sugandhi Utane at Home : यंदा दिवाळीत घरच्या घरी तयार करा सुगंधी उटणे, जाणून घ्या सोपी पद्धत, पाहा Video
तुळशी बाग
तुळशी बाग हे पुण्यातील सर्वात जुने मार्केट आहे. पुण्याच्या मध्यभागी असलेले हे मार्केट ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदु असते. या मार्केटमध्ये कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत, घरगुती वस्तूंपासून कॉस्मेटिक वस्तूंपर्यंत सर्वकाही अगदी कमी दरात मिळते. जर तुम्हाला रेडीमेड गार्मेंट्सची खरेदी करायची असेल, तर तुळशीबागला नक्की भेट द्या. दिवाळीच्या खरेदीसाठी हे बेस्ट मार्केट आहे. येथे तुम्हाला दिव्यांपासून डेकोरेशनचे सर्व सामान मिळेल.
ठिकाण – 93, लक्ष्मी रोड, तुळशीबाग, बुधवार पेठ
फर्ग्युसन कॉलेज रोड
एफसी रोड हे गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. ट्रेंडी फुटवेअर, कपडे, ज्वेलरी तुम्हाला येथे सहज मिळतील. यंदा दिवाळीत कपडे आणि ज्वेलरीची खरेदी करायचा विचार करत असाल तर एफसी मार्केटला अवश्य भेट द्या. येथील शिरोळे मार्केट आणि केसरिया मार्केट विशेष लोकप्रिय आहे.
ठिकाण – फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे