आपल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त खप व्हावा यासाठी विविध उत्पादनांच्या कंपन्या कायमच आकर्षक ऑफर्स जाहीर करत असतात. यामध्ये उत्पादनाच्या किंमतीत सूट देणे. उत्पादनासोबत विविध सेवा देऊन ग्राहकांना खूश करणे अशा स्वरुपाच्या ऑफर्स दिल्या जातात. चारचाकीमध्ये आघाडीवर असणाऱ्या टोयोटानेही नुकतीच आपली ऑफर जाहीर केली असून यामध्ये ग्राहकांना टोयोटाच्या कारवर आकर्षक सूट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे नक्कीच फायद्याचे ठरु शकते.
डिसेंबर महिन्यात आपल्या उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी टोयोटानं ‘रिमेंबर डिसेंबर’ ही ऑफर लाँच केली आहे. या ऑफरमध्ये कॅमरी, प्रियस आणि एलसी ही रेंज वगळता सर्व कारवर ऑफर असणार आहे. ही ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. याआधी टाटा, रेनॉल्ट आणि ह्युदांई या कंपन्यांनीही आपल्या कारवर आकर्षक ऑफर जाहीर केली होती. त्यापाठोपाठ आता टोयोटानं ऑफर आणली आहे.
टोयोटाने काही वर्षांपूर्वी आपली इटियॉस ही रेंज बाजारात दाखल केली. त्यातील मागच्याच वर्षी बाजारात दाखल झालेल्या फेसलिफ्ट प्लॅटिनम इटियॉस या गाडीवर कंपनीने तब्बल ५० हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे. याशिवाय इटियॉस लिवा या सप्टेंबर २०१६ मध्ये लाँच झालेल्या कारवर ३० हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर इटियॉस क्रॉसवर तब्बल ४० हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. याबरोबरच टोयोटानं मार्च 2017 मध्ये कोरोला फेसलिफ्ट कार लाँच केली होती. याच्या अपडेट मॉडेलवर तब्बल ६० हजारांची सूट देण्यात आली असून सरकारी कर्मचाऱ्यांना ४० हजार अतिरिक्त सूट देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा या टोयोटाच्या सर्वाधिक खप असणाऱ्या कार आहेत. या कारला जास्त मागणी असल्यानं त्यासाठी मोठी प्रतिक्षा यादी आहे. मागणी जास्त असल्याने कंपनीने या कारच्या उत्पादनात वाढ केली आहे. डिसेंबरच्या या ऑफरमध्ये या दोन्ही कारवर टोयोटा फायनॅन्शियल सर्व्हिसकडून आकर्षक व्याज दरावर कर्ज देण्यात येणार आहे.