मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (MNP) लवकरच नवे नियम लागू होणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी केवळ तीन दिवस लागणार आहेत. 16 डिसेंबरपासून नवे नियम लागू करण्याचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI)घेतला आहे.

नवे नियम लागू झाल्यानंतर पोर्टिंग प्रक्रिया अधिक वेगवान गतीने तसेच आणखी सोपी होणार आहे. नवीन प्रक्रिया विशिष्ट पोर्टिंग कोड (यूपीसी) आणखी सोपी करण्यासाठी अटी घालण्यात आल्या आहेत. तीन दिवसांत मोबाइल नंबर पोर्ट करणे आवश्यक आहे. तसेच दुसऱ्या सर्कलमध्ये असलेल्या नंबरला पाच दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे. कॉर्पोरेट मोबाइल कनेक्शनच्या पोर्टिंगला वेळेत बदल केले जाऊ शकत नाही, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. नवीन प्रक्रियेचे नियम लागू करताना ट्रायने विविध अटी व शर्ती घातल्या आहेत. नव्या नियमांनुसार, पोस्टपेड मोबाइल कनेक्शन पोर्ट करण्याआधी ग्राहकाला आधीच्या नेटवर्क कंपनीच्या न भरलेल्या बिलाचा भरणा करणं आवश्यक असेल. तसंच, एखाद्या नेटवर्क कंपनीसोबत 90 दिवस सक्रिय राहिल्यानंतरच पोस्टपेड ग्राहक नव्याने नंबर पोर्ट करु शकतो.

आतापर्यंत मोबाइल क्रमांक दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागायचा. पण, नव्या नियमांनंतर केवळ तीन दिवसांचा वेळ लागेल. तर, एकाच सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी नवे नियम लागू झाल्यानंतर 5 दिवस लागणार आहेत. यापूर्वी 11 नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार होता. पण, आता 16 तारखेपासून हा नियम लागू होणार असल्याचं ट्रायने स्पष्ट केलंय.