हृदयशस्त्रक्रिया म्हटले की रुग्णासह कुटुंबाची भीतीने गाळण उडते. परंतु अलीकडे नवनवीन तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया सोप्या झाल्या असून रुग्ण ठणठणीत बरेही होतात. परंतु यासाठी घाबरून न जाता शस्त्रक्रियेची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. यातील एक महत्त्वाची शस्त्रक्रिया म्हणजे हृदयात कृत्रिम झडप प्रत्यारोपण.

बिपीनचंद्र भामरे

हृदयातील झडपा (व्हॉल्व) खराब झाल्यावर त्या जागी नवीन झडपा बसविण्यासाठी हृदय शस्त्रक्रिया करावी लागते. याला झडप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असे म्हणतात. खराब झालेल्या झडपेमुळे हृदयविकार बळावू शकतो. त्यामुळे प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे.

हृदयाकडून शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठी मोठय़ा रक्तवाहिन्या असतात. अशावेळी हृदयातून एकतर्फी रक्तप्रवाह सुरक्षित सुरू ठेवणे, ही हृदयाच्या झडपांची जबाबदारी आहे. हृदयामध्ये म्रिटल, एरोटिक, ट्रायक्युसिड आणि पल्मिनरी अशा चार झडपा असतात.

वाढत्या वयानुसार हृदयाला सूज येणे, छातीत दुखणे, दम लागणे आणि हृदयाच्या झडपाला विषाणूंचा संसर्ग झाल्यास झडपा हळूहळू खराब होतात. हदयाकडून शरीराला रक्तपुरवठा करण्याऱ्या मोठय़ा रक्तवाहिन्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास शरीरातील अन्य अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. हृदयाच्या पंपिंगची

क्षमता खूप कमी झालेली असते, अशा

वेळी हृदयाची झडप बदलणे हा एकमेव

पर्याय असतो. याशिवाय हृदयाची धमनी फुटल्याने अचानक छातीत रक्तस्राव होऊ लागतो. अशा वेळी मृत्यू होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा स्थितीत लगेचच तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागते. वेळीच उपचार झाल्यास रुग्णांचे प्राण वाचवता येऊ  शकते.

शस्त्रक्रिया कोणावर केली जाते?

अशक्तपणा, श्वासोच्छवासाची समस्या, छातीत दुखणे आणि चक्कर येणे अशी लक्षणे आढळून येणाऱ्या रूग्णांना महाधमनी झडप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी हृदयातील झडपेची स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी रुग्णाची इकोकार्डियोग्राफी तपासणी केली जाते. जर रुग्णांच्या हृदयातील धमनीची अवस्था बिकट असल्यास डॉक्टर लगेचच हृदयाची झडप बदलून घेण्याचा सल्ला देतात. 

हृदयाची झडप बदलणे या शस्त्रक्रियेबद्दल अनेकांच्या मनात भीती असते. परंतु शस्त्रक्रिया करण्याआधी डॉक्टरांकडून ही प्रक्रिया जाणून सर्व शंका दूर केल्या पाहिजेत. या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची वैद्यकीय चाचणी केली जाते. या चाचणी अहवालावरून रुग्णाला कुठलीही अ‍ॅलर्जी नाही ना हे पाहून औषधोपचार सुरू केले जातात. याशिवाय शस्त्रक्रियेआधी धूम्रपान व मद्यपान सोडण्यास डॉक्टर सांगतात.

हृदयाची झडप प्रत्योरापण शस्त्रक्रिया केल्यानंतर एक आठवडा रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला घरी सोडले जाते. साधारणत: सहा ते आठ आठवडय़ानंतर हा रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. आपल्या हृदयाच्या झडप शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यावर बद्धकोष्ठता, जखमेच्या सूज किंवा लालसरपणा, भूक कमी होणे आणि त्वरित वेदना यांसारखी समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(लेखक हृदयविकारतज्ज्ञ आणि थोरॅसिक सर्जन आहेत.)

शस्त्रक्रिया कशी करतात?

ही शस्त्रक्रिया भूल देऊन केली जाते. या शस्त्रक्रियेसाठी साधारणत: चार तास लागतात. यात छातीच्या उजव्या बाजूला एक लहानसा छेद करून ही शस्त्रक्रिया केली जाते. हृदय आणि फुफ्फुसांचे काम करण्यासाठी बायपास मशीन वापरली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान हृदय थांबविले जाते.  खराब झालेल्या झडपेच्या जागी कृत्रिम झडप बसविली जाते.