Travel Tips For Rainy Season : अनेक राज्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात अनेकांना निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याचे वेध लागतात. आल्हाददायी वातावरणात हिरवाईने नटलेल्या वनराईची अनेक जण आतुरनेते वाट पाहतात.अनेकांना पावसाळा खूप आवडतो. या ऋतूमध्ये फिरण्याची वेगळीच मजा असते. जर तुम्हालाही पावसाळ्यात फिरण्याची आवड असेल आणि येत्या काही दिवसांत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल, तर या पाच ठिकाणी चुकूनही जाऊ नका.
१) उत्तराखंड
उत्तराखंड हे भारतातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. देश-परदेशांतील पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. मसुरी, नैनिताल व हृषिकेश यांसारख्या हिल स्टेशन्ससह येथे भेट देण्यासारखी अनेक चांगली ठिकाणे आहेत. पण, पावसाळ्यात या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने तिथे दरड कोसळण्याची समस्या कायम असते. अशा परिस्थितीत पावसाळ्यात येथे पर्यटनासाठी जाणे कठीण आणि धोकादायक ठरू शकते.
२) लडाख
नैसर्गिक सौंदर्याने नटलेले लडाख हे केवळ आपल्या देशातच नाही, तर परदेशांतही प्रसिद्ध आहे. येथील सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी येत असतात. मात्र, पावसाळ्यात लडाखला न येण्याचा सल्ला दिला जातो. कारण- पावसामुळे लेह-मनाली महामार्ग व लेह-श्रीनगर महामार्ग यांसारख्या लडाखकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भूस्खलनाचा धोका असतो. अशा परिस्थितीत येथील रस्ते तात्पुरते बंद केले जातात
३) हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली व धरमशाला यांसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे आणि रस्ते बंद होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत हिमाचलमध्ये पर्यटनासाठी जाणे आव्हानात्मक ठरू शकते.
४) गोवा
गोवा हे पर्यटनासाठी जगभरातील लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक प्रसिद्ध बीचेस आहेत. परंतु, पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस असतो आणि या काळात समुद्रकिनाऱ्याची पातळीही खूप वाढते. अशा स्थितीत पावसाळ्यात वॉटर रायडिंगच्या अनेक ॲक्टिव्हिटी बंद असतात. त्यामुळे पावसाळ्यात गोव्याला जाण्याचा प्लॅन चुकूनही बनवू नका.
५) अंदमान आणि निकोबार
अंदमान आणि निकोबार या बेटांवर पावसाळ्यात जोरदार पाऊस आणि वारे वाहतात. अशा स्थितीत येथील वाहतूक व जलवाहतुकीत मोठी अडचण होते. त्यामुळे तुम्हीही येत्या काही दिवसांत या बेटांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर तूर्तास तो बेत सोडून द्या.