How To Reduce Motion Sickness: उन्हाळयाच्या दिवसांमध्ये कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? आपल्यापैकी अनेकांना प्रवासात उलटी होण्याचा त्रास असतो. तुम्हीच सांगा तुम्ही कुठल्याही पिकनिकमध्ये भले मग तुम्ही कारने जात असो किंवा बसने एक तरी असा माणूस असतो ज्याला मळमळीचा त्रास होतोच. अनेकांना चार चाकी गाडी लागते असं म्हणतात. पण हे गाडी लागणे म्हणजे नेमकं काय आणि असं कशामुळे होतं? यावर उपाय काय हे आज आपण जाणून घेणार आहोत.
डॉ बीपी त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवासामध्ये विशेषतः चार चाकी गाडीने प्रवास करताना अनेकांना उलटी होणे, अस्वस्थ वाटणे, चक्कर व मळमळ जाणवू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे मोशन सिकनेस. जेव्हा तुम्ही प्रवासाच्या वेळी खिडकीतून बाहेर बघता तेव्हा एकाच वेळी कान, डोळे, व त्वचा तुमच्या मेंदूला विविध संकेत देत असते. यामुळेच नर्व्हस सिस्टीममध्ये संभ्रम निर्माण होण्याचा धोका असतो.
इतकंच नाही तर तुम्ही प्रवासात काही वाचत असाल किंवा मोबाईल पाहात असाल तरी मेंदू व अवयवांचा ताळमेळ बिघडू शकतो.
प्रवासात उलटी येत असल्यास काय उपाय करावे?
- तुम्हाला सतत मळमळ होत असेल तर आलेपाक, आवळा सुपारी किंवा पेपरमिंट माऊथ फ्रेशनर तुमचा त्रास कमी करू शकते. त्यामुळे विशेषतः लांबच्या प्रवासात आवर्जून या गोष्टी जवळ बाळगा.
- प्रवासाआधी लवंग भाजूस वाटून घ्या व यात किंचित सैंधव मीठ घालून चूर्ण करा. हे मिश्रण मळमळ थांबवण्यात नामी उपाय ठरू शकते.
- रिकाम्या पोटी प्रवास करणे टाळा. तुम्हाला जड काही खायचे नसल्यास तुम्ही फळे सुद्धा खाऊ शकता. रिकामे पोट असल्यास त्यात आम्ल वाढू शकते.
- लिंबू, कोल्ड्रिंक, आले किंवा पुदिन्याचे सेवन करू शकता.
- मागच्या सीटवर बसणे टाळा.
हे ही वाचा<< जेवायला बसण्याची योग्य पद्धत कोणती? मांडी घालून बसल्यास नेमकं होतं तरी काय?
डॉ. बीपी त्यागी सांगतात की आपण शरीराला हायड्रेटेड ठेवायला हवे. अनेकदा प्रवाशाच्या वेळी लघवीला जायला लागू नये या चिंतेने अनेकजण पाणी कमी पितात. पण यामुळे त्रास वाढू शकतो. तुम्हालाही असा त्रास होत असल्यास वरील उपाय नक्की लक्षात ठेवा.