आपण चांगल्या मोठ्या कंपनीत काम करावे, चांगली नोकरी मिळावी असे सगळ्यांचेच स्वप्न असते आणि अशा आवडत्या जॉब्सची वाटदेखील बरेचजण पाहत असतात. आता तुम्हाला हव्या असणाऱ्या कंपनीने जॉब इंटरव्ह्यूसाठी बोलावले आहे असा विचार करा. तुम्ही हा इंटरव्ह्यू चांगला जाण्यासाठी प्रचंड मेहेनतसुद्धा घेतलीत. पण, त्या कंपनीमध्ये पोहोचताच जर तुम्हाला तुमच्या पोटातून विचित्र आवाज येऊ लागले किंवा तेथील सर्व मंडळी तुमच्या चेहऱ्याकडे पाहत आहेत हे तुम्हाला जाणवलं तर ते किती विचित्र वाटेल, नाही का? असे होण्यामागचे कारण, तुम्ही खाल्लेले पदार्थ असू शकतात.
एखाद्या महत्वाच्या ठिकाणी, कामासाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी जात असताना आपण काय खात आहोत, याकडे आपले फारसे लक्ष नसते. परंतु, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जॉब इंटरव्ह्यू चांगला जावा यासाठी या पाच महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवा, पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जॉब इंटरव्ह्यूआधी कोणते पदार्थ खाणे टाळायला हवे?

१. कांदा-लसूण

जवळपास सर्वच भारतीय पद्धतीच्या जेवणामध्ये कांदा लसूण वापरले जाते. या दोन गोष्टी कोणत्याही पदार्थांची चव वाढवत असल्या, तरीही त्याचा एक विशिष्ट प्रकारचा वास आपल्या हाताला आणि तोंडाला येतो. त्यामुळे पहिल्या भेटीतच अशी तोंडाची दुर्गंधी समोरच्याला जाणवली तर त्याचा चुकीचा परिणाम तुमच्या इंटरव्ह्यूवर होऊ शकतो. म्हणून कोणत्याही इंटरव्ह्यूआधी असे पदार्थ खाणे टाळावे. परंतु, ते शक्य नसल्यास किमान पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरून, ब्रश करून आपल्या तोंडाची स्वच्छता करावी.

२. तळलेले पदार्थ

खरंतर तळलेले पदार्थ खाणे टाळावे असे सल्ले आपण सतत ऐकत असतो. कारण मुळातच ते आरोग्यासाठी चांगले नसून त्यामध्ये कोणतेही पोषक घटकदेखील नसतात. त्यामुळे असे पदार्थ जॉब इंटरव्ह्यूच्या आधीदेखील खाणे टाळावे. तळलेल्या पदार्थांमध्ये, अर्थातच तेलाचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे तुम्हाला पचनाच्या समस्या आणि पोट जड झाल्यासारखे वाटू शकते. त्यासोबतच पोटामधून विचित्र आवाजदेखील येऊ शकतात. त्यामुळे बाहेर भजी, कचोरी, वडे किंवा कोणत्याही प्रकारचे तळणीचे पदार्थ खाण्याचे टाळावे.

हेही वाचा : काकडी टोमॅटोची कोशिंबीर आरोग्यासाठी चांगले की वाईट? आयुर्वेद काय सांगते ते पाहा

३. कॅफिन

रस्त्यावर चहाची एखादी टपरी दिसल्यास किंवा इंटरव्ह्यूसाठी अजून वेळ आहे म्हणून मध्ये काहीतरी करण्यासाठी चहा, कॉफी यांसारख्या उत्तेजित पेयांचे सेवन केले जाते. या पदार्थांनी तुम्हाला तरतरी येते असे जरी वाट असेल, तरीही हे जॉब इंटरव्ह्यूआधी पिणे टाळावे. कोणत्याही इंटरव्ह्यूआधी आपल्या मनात थोडीफार भीती किंवा चिंता असते. चहा, कॉफी पिण्याने काहीकाळ बरे वाटले, तरीही या पेयांमुळे या भावना वाढण्याची शक्यता असू शकते, असे एनडीटीव्ही फूडच्या एका लेखातील माहितीवरून समजते. त्यामुळे जर अशी पेय पिणार असाल तर एक कपपेक्षा अधिक पिऊ नये.

४. साखरेचे पदार्थ

ज्या पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर असते, असे पदार्थ विशेषतः इंटरव्ह्यूआधी खाणे टाळावे. कारण अतिरिक्त साखरअसलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची शक्यता असते. असे झाल्यास तुम्हाला मळमळ किंवा हातपाय थरथरल्यासारखे वाटू शकतात. त्यामुळे केक, डोनट्स, चॉकलेट, गोळ्या यांसारख्या रिफाईंड साखरेचे पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी अधिक प्रथिने आणि फायबर असणाऱ्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करावा.

५. कार्बोनेटेड पेय

कोणत्याही प्रकारची कार्बोनेटेड पेये जॉब इंटरव्ह्यूआधी पिणे टाळावे. अशा पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून, कार्बन डाय ऑक्साईड असते. या पेयांमुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असून, पोटात गॅसदेखील होऊ शकतात. इंटरव्ह्यूदरम्यान पोटामध्ये गॅससारख्या समस्या झालेल्या कोणालाही आवडत नाहीत, त्यामुळे असा प्रसंग टाळण्यासाठी कार्बोनेटेड पेयांचे सेवन करू नये.

अशावेळी काय खावे किंवा काय प्यावे असा प्रश्न पडला असल्यास, यावर एक सर्वात सोपा पर्याय आहे. कॅफिन किंवा कार्बोनेटेड पेये पिण्यापेक्षा, पाणी पित राहणे केव्हाही फायद्याचे ठरू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Try not to eat these five food items before going for any job interview dha
Show comments