पावसाळ्याच्या दिवसात चवदार आणि चटपटीत खाण्याची इच्छा होत असते. मात्र असं बाहेरचं चटपटीत खाल्ल्याने आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आपण बाहेरचं खाणं टाळतो. चवदार पदार्थासोबत निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश आवर्जून करावा. ज्याने तुम्हाला चटपटीत चवदार पदार्थांचा आस्वाद घेता येईल आणि तुम्ही निरोगीसुद्धा राहाल. तुमच्यासाठी पावसाळ्यात चमचमीत पण पौष्टिक अशी डिश फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला यांनी शेअर केली आहे. त्यांनी कडधान्यांची भेळ कशी बनवायची याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात पौष्टिक, चवदार आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणारी ही भेळ बनवायची तरी कशी.
साहित्य
दीड वाटी मोड आलेले मूग
एक उकडलेला बटाटा
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून पुदिना चटणी
१ टिस्पून चिंचेची चटणी
चवीनुसार मीठ
आवडीनुसार बारीक शेव
कृती
एका बाऊल मध्ये वरील सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार बारीक शेव टाका. खाण्यासाठी तयार आहे पौष्टिक व चवदार चमचमीत मोड आलेल्या (sprout) मुगाची भेळ. तुम्ही देखील ही भेळ नक्की ट्राय करून बघा.
View this post on Instagram
फायदे
मोड आलेले सर्वच कडधान्य पौष्टिक आणि चविष्ट लागते. रोज सकाळी मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने शरीराला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात. तसेच अनेक आजारांपासून सुटका होते.
मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने तुमची दृष्टी सुधारते तसेच डोळ्यांच्या सर्व विकारांपासून तुमची सुटका होते.
कडधान्य खाल्ल्याने तुमचं पोट लवकर भरतं. तसंच तुम्हाला लवकर भूक लागत नाही. परिणामी तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
तुम्हाला जर अन्न अपचनाचा त्रास होत असेल तर, रोज सकाळी मोड आलेले धान्य खा.
मोड आलेल्या कडधान्यांच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते.