चांगल्या आरोग्यासाठी आहाराची काही पथ्ये पाळणे आवश्यक असतात. त्यासाठी नाश्ता राजासारखा करावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण गरीबासारखे करावे असं म्हणतात. भरपेट नाश्ता न केल्यास थोड्या थोड्या वेळाने भूक लागत राहते, पोटातून आवाज येतात आणि दिवसाची सुरुवात उत्साही होत नाही. त्यामुळेच दिवस चांगला जाण्यासाठी भरपेट नाश्ता करणे महत्त्वाचे असते. मात्र, अनेकांना त्याबद्दलची योग्य माहिती नसते. मात्र, नाश्त्यात काही पौष्टिक गोष्टींचा समावेश केल्यास तुम्हाला सारखी भूक लागणार नाही आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील.
दूध
कोणताही नाश्ता दुधाशिवाय पूर्ण होत नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गायीच्या दूधात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात. दूध आवडत नसल्यास ओट्स, कॅलोक्ससारखे पदार्थ दुधाबरोबर खाऊ शकता. सकाळी घाईत असल्यास आणि नाश्ता करायला जास्त वेळ नसल्यास काही फळांच्या फोडी आणि दूध घेतले तरी बराच काळ भूक लागत नाही.
अंडी
एक अंड हा संपूर्ण आहार आहे असे म्हटले जाते. अंडी हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. नाश्त्याला अंड खाल्ल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही. फक्त उकडलेलं अंड खाण्याऐवजी ते अधिक पौष्टीक आणि चविष्ट बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अंड्याचे पदार्थही नाश्त्याला खाता येतील. नाश्त्यामध्ये ब्रोकली, टोमॅटो आणि चीजसोबतच ऑम्लेच असेही कॉम्बिनेशन ट्राय करायला हरकत नाही.
ओट्स किंवा ओटमील
ओट्स किंवा ओटमील नाश्त्याला खाण्याचे फॅड आहे असे अनेकजण म्हणतात. मात्र, खरोखरच या पदार्थांपासून शरीरारला भरपूर फायबर मिळते. यामुळे हे खाल्ल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही. ओटमील लोह, मॅग्नेशियम आणि ब जीवनसत्वाचा चांगला स्त्रोत आहे. फळांबरोबरच ओट्सचा नाश्त्यामध्ये समावेश करणे फायद्याचे असते.
बदाम
बदामामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. सकाळी सकाळी बदाम खालल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही. दिवसभरात १० ते १५ बदाम खाल्ल्याने वेळी-अवेळी भूक लागत नाही. नाश्त्यामध्ये बदामाचा समावेश करणे शक्य नसल्यास रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी दूधासोबत बदमाचे सेवन केले तरी सतत भूक लागत नाही.
ज्यूस
नाश्त्यामध्ये भाज्यांचा आणि फळांच्या रसाचा समावेश करावा. सकाळी भाज्या आणि फळांचा रस प्यायल्याने दिवसाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे मिळतात. साखरयुक्त रसापेक्षा मिल्कशेकला प्राधान्य देणे फायद्याचे ठरते.
दही
दह्यामध्ये कॅल्शियमसोबतच प्रोटीन्सही मोठ्या प्रमाणात असतात. फक्त दही आवडत नसल्यास त्यामध्ये फळांचे तुकडे टाकून हे चविष्ट दही नाश्त्याला खात येईल. दह्यात ड्रायफ्रूट्स टाकून खाल्ले तरी ते चवीला छान लागते शिवाय ते आरोग्यासाठीही फायद्याचे असते.
सफरचंद
‘ईट अॅपल अ डे कीप डॉक्टर अवे ‘ अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. नाश्त्याला सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. सफरचंदामध्ये फायबर असतात. नाश्त्याला फायबरयुक्त पदार्थ खालल्यास दीर्घकाळ भूक लागत नाही. नुसतं सफरचंद खाण्याऐवजी पीनट बटर किंवा इतर पदार्थ लावून थोड्या हटके पद्धतीने सफरचंद पोटात ढकलणे चवीच्यादृष्टीने आणि पोटासाठी फायद्याचे ठरते.
पीनट बटर
अनेकजण नाश्त्याला ब्रेड-बटर खातात. मात्र, साध्या बटर ऐवजी पीनट बटर खाल्ल्यास ते जास्त फायद्याचे असते. दोन चमचे पीनट बटरमधून आठ ग्रॅम प्रोटीन मिळते. या दोन चमचे बटरमध्ये १९० कॅलरी असतात. शुगरलेस पीनट बटर होलग्रेन ब्रेड, ब्राऊन ब्रेड किंवा ओटमीलसोबत खाणे आरोग्यासाठी फायद्याचे तर असते. त्यामुळे बराच काळ भूकही लागत नाही.
पनीर
पनीर हा कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. कॅल्शियमशिवाय पनीरमध्ये प्रोटिन्सचे प्रमाणही जास्त असते. अर्धा कप पनीरमधून ९० कॅलरी शरीरात जातात. पनीरमधील केसिन नावाच्या प्रोटिनचे लवकर विघटन होत नाही त्यामुळे नाश्त्याला पनीर खालल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही.
सुकामेवा
सुकामेवा हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. सुकामेव्यातील सर्वच घटक हे प्रोटीन आणि फायबरयुक्त असतात. अक्रोड, मनुके, बदाम, पिस्ता, शेंगदाणे, काजू नाश्त्यात खाल्ल्यास फायदा होतो.