दिवसभराच्या कामांमध्ये बऱ्याच वेळा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. बदलेली जीवनशैली, तणाव, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक अशा गोष्टींचा आरोग्यावर परिणाम झालेला लगेच दिसून येतो. यासाठी योग्य आणि पुरेपूर आहार घेणे, पुरेसा व्यायाम करणे असा सल्ला तज्ञ देतात. दिवसभरातील कामं करून आपण थकतो आणि त्यामुळे बऱ्याच जणांना जेवल्यावर लगेच झोपायची सवय असते. पण यामुळे अन्नपचनाच्या समस्या किंवा वजन वाढण्याची शक्यता अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यासाठी रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नये.
आपल्या रोजच्या अशा काही सवयी नकळतपणे अनेक आजरांना आमंत्रण देत असतात. हे टाळण्यासाठी जाणीवपुर्वक स्वतःला आरोग्यासाठी लाभदायक ठरणाऱ्या काही सवयी लावणे आवश्यक असते. रात्री झोपण्यापुर्वी करायच्या अशा काही सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या, तर या सवयी निरोगी राहण्यासाठी नक्की मदत करतील. कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घेऊया.
आणखी वाचा : बुटांमधील दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय; लगेच जाणवेल फरक
रात्रीच्या जेवणात हलक्या पदार्थांचा समावेश करा
शरीर निरोगी ठेवण्यासाठी रात्रीचे जेवण अतिशय हलके आणि पौष्टिक पदार्थांनी भरलेले असणे आवश्यक आहे. रात्रीच्या जेवणात जड अन्नपदार्थ खाल्ले तर ते नीट पचत नाहीत, याचे मुख्य कारण म्हणजे रात्रीच्या वेळी कमी मेटाबॉलिक रेट असल्याचे मानले जाते. अन्नाचे नीट पचन झाले नाही तर पोषकद्रव्ये योग्य प्रकारे शोषली जात नाहीत आणि त्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणात हलक्या पदार्थांचा समावेश करावा.
जेवणानंतर शतपावली करा
जेवणानंतर शतपावली करण्याचा म्हणजेच थोडा वेळ चालण्याचा सल्ला बरेच जण देतात. रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे चालण्याने पचन नीट होते आणि चांगली झोप तर येते, याबरोबरच या सवयीमुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की जर तुम्ही झोपण्यापुर्वी १० ते १५ मिनिटे चालत असाल तर त्यामुळे जेवणानंतर शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढत नाही, ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.
आणखी वाचा : या सवयींमुळे वाढतो मधूमेह होण्याचा धोका; लगेच करा बदल
जेवणानंतर कॅफिन आणि निकोटिन असणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळा
कॅफिन आणि निकोटीन हे उत्तेजक पदार्थ असल्याचे मानले जाते, यांच्या सेवनाने झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो, म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर अशा पदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. रात्री कॅफिनचे सेवन केल्याने झोपेची समस्या, तसेच पचनाशी निगडित समस्या वाढू शकतात. कॅफीन आणि निकोटीन व्यतिरिक्त, तज्ञ अल्कोहोलचे सेवन न करण्याचा सल्ला देतात.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला द्या.)