सोन्याचे मौल्यवान दागदागिने, पुरातन मोहरा, रत्नजडीत मुकूट अशा एक-दोन नव्हे तर तब्बल २६ प्रकारच्या मौल्यवान दागिन्यांचा साज तुळजाभवानी देवीच्या महाअलंकाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या सर्व दागिन्यांचे वजन तब्बल ११ किलो २२८ ग्रॅम एवढे आहे. लकाकणारे गुलाबी रंगाचे माणिक, सूर्यकिरणांसारखी लख्ख चमक असलेले हिरे, पिवळाधमक पुष्कराज, हिरकणी, पाचू, असा शेकडो वर्षांचा हा अलौकिक ठेवा नवरात्रोत्सवातील महाअलंकार पुजेत भाविकांना पहायला मिळणार आहे. वर्षातील महत्वाच्या उत्सवातच हा मौल्यवान ठेवा मंदिराच्या स्ट्राँगरूममधून बाहेर काढला जातो.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीचे वार्षिक उत्पन्न सध्या ३० कोटी रूपयांच्या घरात आहे. मंदिर संस्थानची रोकड यंदा १०० कोटींचा आकडा पार करत आहे. या व्यतिरिक्त तुळजाभवानी देवीच्या चरणी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह इतर मौल्यवान धातूंची संख्याही मोठी आहे. दरवर्षी देवीचरणी मोठ्या श्रद्धेने अर्पण होणारा सोन्या-चांदीचा भक्तीभाव वगळता, देवीच्या खजिन्यात असलेल्या पुरातन दाग-दागिन्यांची संख्या खूप मोठी आहे. तुळजाभवानी देवीचे दागिने वेगवेगळ्या सात पेट्यांमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्यातील सात क्रमांकाच्या पेटीतील दागिने देवीच्या नित्योपचार पुजेसाठी वापरले जातात. तर नंबर एकच्या पेटीमधील शिवकालीन, निजामकालीन, किंबहुना त्यापेक्षा पुरातन असलेल्या मौल्यवान दागिन्यांचा श्रृंगार केवळ महाअलंकार पुजेतच मांडला जातो.
मोर्चेल म्हणजेच चवरी नावाचा एक पुरातन दागिना शेकडो वर्षांपासून देवीच्या महाअलंकाराची शोभा वाढवित आहे. चवरी म्हणजे सोन्याची मूठ. दोन नक्षीदार चवरी देवीच्या महाअलंकार पूजेत वर्षातील महत्वाच्या काळात वापरल्या जातात. या चवरीमध्ये मोरपिस खोवून देवीला त्याने वारा घातला जातो. दररोज दोनवेळची आरती, त्यानंतर नैवेद्य आणि त्यानंतर हा पंखा देवीच्या सेवेसाठी वापरला जातो. त्याचबरोबर पाडव्यापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत तुळजापूर शहरातील मानकरी असलेले पलंगवाले दुपारी एक ते चार वाजेपर्यंत देवीला यानेच वारा घालतात.
चांदी आणि सोन्याच्या धातूपासून तयार केलेले शेवंतीचे फूल हा कलेचा अप्रतिम नमुना आहे. नेमके हे शेवंतीचे फूल देवीचरणी कोणी अर्पण केले, केंव्हा अर्पण केले, याची कोणतीही अधिकृत नोंद मंदिर संस्थानकडे उपलब्ध नाही. फक्त २७ ग्रॅम वजन असलेला हा सोने आणि चांदी या धातूपासून तयार केलेला दागिना सौंदर्याचा सर्वोत्तम मापदंड आहे.
एक किलो ८०० ग्रॅम वजन असलेली पाच पदरांची १७०० पुतळ्यांची माळ तब्बल अडीच फूट व्यासाची आहे. त्याखाली सर्वात मोठे पदक आणि शेजारी पाच पदकांची मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक पदकाला हिरकण्या, माणिक, पाचू, मोती आणि पवळा जडविण्यात आल्या आहेत. पोर्तुगीज सेनापती भुसी याने हा दागिना देवीचरणी अर्पण केल्याचा दावा केला जातो. मात्र मंदिर प्रशासनाकडे तशी अधिकृत नोंद उपलब्ध नाही.
देवीचा चिंताक किंवा सरी, माणकाची माळ, माणकाचे पदक, सतलडा, कलगीतुरा, नेत्रजोड, शिरपेच, चाँदकोर, हिरकणी पदक, देवीची वेणी, अशा कितीतरी प्राचीन दागिन्यांचा ठेवा तुळजाभवानी देवीची श्रीमंती विशद करणारा आहे. मात्र हे दागिने नेमके कोणत्या काळातील आहेत ? देवीचरणी ते कोणी अर्पण केले ? आणि आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत काय ? याचा कोणताही तपशील नोंदवून ठेवण्याची खबरदारी मंदिर प्रशासनाने घेतलेली नाही.