प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट अर्थात Twitter ने अलीकडेच एक नवीन डिझाईन जारी केलं आहे. यात नवीन फॉंट सादर करण्यात आला असून लेआउटमध्ये देखील किरकोळ बदल करण्यात आले आहेत. परंतु, आता या नवीन डिझाईनमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या नवीन डिझाईनमुळे आपल्याला डोकेदुखी, डोळ्यांची समस्या आणि अंधुक दृष्टीची समस्या उद्भवल्याची तक्रार ट्विटर युझर्स करत आहेत.गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विटर युझर्स सतत या नव्या डिझाईनबद्दल लिहित आहेत आणि कंपनीकडे याबाबतची तक्रार करत आहेत. बऱ्याच युझर्सनी याबाबत अशी तक्रार केली आहे की, ही नवीन डिझाईन डोळ्यांवर ताण आणत आहे आणि डोकेदुखीला देखील कारणीभूत ठरत आहे.

कॉन्ट्रास्ट रंग, नवीन फॉंट आणि डोकेदुखी

ट्विटरने फॉलो बटणापासून अनेक पर्यायांचा रंग बदलून कॉन्ट्रास्ट केला आहे. दरम्यान, फॉंटबाबत देखील युझर्सची ट्विटरवर दोन मतं आहेत. काही युझर्स हे डिझाईन चांगलं असल्याचं म्हणत आहेत. तर काही युझर्स ठाम आहेत कि या फॉंटमुळे डोळ्यांना त्रास होत आहे. नवीन डिझाईन निवडीबाबत कंपनीला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही युझर्स म्हणत आहेत की, ऑटिस्टिक व्यक्तीसाठी हाय कॉन्ट्रास्ट ऑप्शन्स योग्य नाहीत. त्यांना याचा त्रास होऊ शकतो.

तर काही युझर्सनी ट्विट करून म्हटलं आहे कि, हे नवीन फॉंट सतत बघितल्यानंतर दृष्टी अंधुक झाल्यासारखी वाटते. याचसोबत बर्‍याच युझर्सनी असंही म्हटलं आहे कि, Chirp फॉंटमुळे त्यांना आपल्याला वाचनामध्ये देखील समस्या उद्भवत आहेत.

युझर्सच्या तक्रारींनंतर कंपनीकडून बदलांना सुरुवात

काही ट्विटर युझर्स सांगत आहेत की त्यांची काही विशिष्ट वैद्यकीय स्थिती आहे. त्यात ट्विटरच्या या नवीन फॉंटमुळे त्यांना डोकेदुखीचा त्रास होत आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अलीकडेच ट्विटरने आपल्या युझर्सना नवीन फॉंटमुळे उद्भवणाऱ्या डोकेदुखी, मायग्रेन किंवा डोळ्यांवर ताण अशा समस्यांबद्दल कंपनीला माहिती देण्यास सांगितलं होतं. दरम्यान ट्विटरने आता म्हटलं आहे की, युझर्सच्या तक्रारीनंतर कंपनी सर्व बटणांचे कॉन्ट्रास्ट बदलत आहेत. ट्विटरच्या मते, कंपनी लोकांचं ऐकत आहे आणि त्यानुसार बदल करत आहे.

Twitter नेमकी काय पावलं उचलणार?

गिज्मोडोने दिलेल्या अहवालानुसार, डिसेबल्ड लिस्टचे संस्थापक सदस्य अॅलेक्स हॅगार्ड यांनी म्हटलं आहे की, एक्सेसिबलिटी ही एक अशी गोष्ट आहे कि जी एका मापात बनवली म्हणजे सर्वांसाठीच योग्य ठरेल असं नाही. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ट्विटरची ही नवी डिझाईन आहे. दरम्यान, आता ट्विटर यावर नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

असंही म्हटलं जातं आहे कि, कंपनीने नवीन डिझाईनमधील बदल हे पर्यायी ठेवले असते तर योग्य ठरलं असतं. म्हणजेच, ज्याला हे नवीन डिझाईन आवडेल ते वापरतील आणि बाकीचे युझर्स जुन्या डिझाईनचा वापर करतील. त्याचप्रमाणे, जर बहुतांश लोकांना ही नवीन डिझाईन आवडली तर कंपनीला जुनी डिझाईन काढून टाकता आली असती. मात्र, तसं करण्यात आलेलं नाही. त्यामुळे, यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.