लंडन : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे अधिक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाचे अनेकांकडून सेवन केले जाते. मात्र प्रमाणापेक्षा अधिक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थामुळे कर्करोग होऊ शकतो, असे ब्रिटनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अति प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाचा जास्त वापर कर्करोगाच्या वाढीशी जोडण्यात आला आहे, असे या संशोधकांनी सांगितले.
ब्रिटनमधील ‘इम्पीरियल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’च्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. या संशोधकांनी अति प्रक्रिया केलेले अन्न आणि कर्करोग होण्याचा धोका यांच्यातील संबंधांचे आजपर्यंतचे सर्वात व्यापक मूल्यांकन केले आहे. शीतपेये, बेकरीचे पदार्थ, तयार खाद्यपदार्थ यांवर अधिक प्रक्रिया केली जाते. या पदार्थाचे वारंवार सेवन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
अति प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ अनेकदा तुलनेने स्वस्त, सहजपणे उपलब्ध होणारे आणि चमचमीत असतात. आरोग्यदायी पदार्थाना पर्याय म्हणून अनेकदा या पदार्थाचे सेवन केले जाते. या पदार्थामध्ये मीठ, चरबी व साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यात कृत्रिम पदार्थ असतात. लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसह अनेक आजार या पदार्थाचे सातत्याने सेवन केल्यास होऊ शकतात. मात्र या पदार्थाचे नेहमी सेवन केल्याने कर्करोगही होऊ शकतो, असे या संशोधकांनी सांगितले. त्यासाठी या संशोधकांनी दोन लाख मध्यमवयीन प्रौढ व्यक्तींची आहाराविषयी माहिती गोळा केली. संशोधकांनी १० वर्षांच्या कालावधीत सहभागींच्या आरोग्याचे निरीक्षण केले. त्या वेळी असे आढळले की अधिक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाचे जास्त सेवन केल्याने एकूणच कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. अंडाशय, स्तर आणि मेंदूच्या कर्करोगाशी या आहाराचा संबंध असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.