भारतात मातांचे बाळंतपण किंवा गर्भधारणेच्यावेळी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण १९९० ते २०१३ या काळात कमी झाले आहे. परंतु गेल्या वर्षी नायजेरिया व भारत मिळून जगातील अशा मातामृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू झाले, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.
२०१३ च्या अहवालानुसार गर्भारपण व बालकांच्या जन्माच्यावेळी गुंतागुंत निर्माण होऊन २०१३ मध्ये २८९००० स्त्रियांचा मृत्यू झाला. १९९० मध्ये हे प्रमाण ५२३००० होते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मातांचे बाळंतपणाच्यावेळी होणारे मृत्यू ४५ टक्के कमी झाले आहेत.
सहारा भागातील देशात हे मृत्यूचे प्रमाण ६२ टक्के (१७९०००) तर दक्षिण आशियात २४ टक्के  (६९०००) आहे. देशपातळीचा विचार करता २०१३ मध्ये भारतात १७ टक्के म्हणजे ५० हजार मातांचा मृत्यू झाला तर नायजेरियात १४ टक्के म्हणजे ४० हजार मातांचा मृत्यू झाला. २०१३ मध्ये ज्या दहा देशात ५८ टक्के मातांचा मृत्यू झाला त्यात भारताचा समावेश आहे. इतर नऊ देशात नायजेरिया, काँगो, इथियोपियाय, इंडोनेशिया, पाकिस्तान, टांझानिया, केनिया, चीन, युगांडा या देशांचा समावेश आहे.
अहवालात म्हटले आहे की, भारत मातामृत्यू रोखण्यात प्रगती करीत आहे. भारतात १९९० मध्ये दर लाख जन्मात माता मृत्यूचे प्रमाण ५६० होते ते २०१३ मध्ये १९० इतके खाली आले. ही घट ६५ टक्के आहे.  सहारा-आफ्रिकेत राहणाऱ्या मुलींचा गर्भवती असताना मृत्यू होण्याची शक्यता ४० मध्ये एक आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या बालनिधीच्या उपकार्यकारी संचालक गीता राव गुप्ता यांनी म्हटले आहे.
युरोपमध्ये हीच शक्यता ३३०० पैकी एक असे आहे. मधुमेह, एचआयव्ही, मलेरिया, लठ्ठपणा  यामुळे चार पैकी एक मातामृत्यू होतो. यावर उपाय म्हणून मातांना बाळंतपणाच्या वेळी चांगली काळजी व उपचार मिळाले पाहिजेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या कुटुंब, महिला व बाल आरोग्य विभागाच्या सहायक महासंचालक फ्लाविया बस्ट्रियो यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा