उन्हाळा म्हणजे काही जणांसाठी सुट्टीचे, आनंदाचे दिवस मात्र काही जणांसाठी वैतागाचे दिवस. अनेकदा या वैतागाचं कारण ठरतात घामोळ्या, सतत येणारा घाम आणि त्या घामामुळे येणारा शरीराचा दुर्गंध. नोकरी-व्यवसायानिमित्त रोजच्या रोज बाहेर पडणाऱ्यांना तर ही समस्या अधिक त्रासदायक ठरते. मग त्यासाठी परफ्युम, डिओ मारणं आलंच. पण तुम्हाला माहित आहे का हा घामाचा वास टाळण्यासाठी आपण काही सोपे घरगुती उपायही करू शकतो.
काखेतल्या घामामुळे येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी काखेमध्ये कोरफड जेल (AloeVera Gel) लावा आणि ३० मिनिटांनी ते पाण्याने धुवून टाका. ही दुर्गंधी घालवण्यासाठी लिंबाचा वापरही करता येऊ शकतो. लिंबाच्या रसामध्ये बेकिंग सोडा टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावा. १५ मिनिटांनी ही पेस्ट धुवून टाका.
हेही वाचा – Cold Water: उन्हाळ्यात बर्फाचं पाणी पिणं योग्य की अयोग्य?, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
काखेतली दुर्गंधी दूर करण्यात टोमॅटोचा रसही प्रभावी आहे. हा रस १० मिनिटांसाठी काखेत लावा आणि नंतर धुवून टाका. अॅपल सायडर व्हिनेगरही काखेतली दुर्गंधी घालवण्याच्या कामी येऊ शकतो. त्यासाठी हा व्हिनेगर पाण्यात मिसळा आणि त्यानंतर हे पाणी काखेमध्ये लावा. काही वेळानंतर हे धुवून टाका.
खोबरेल तेलाचे अनेक गुण आहेत, त्यापैकी काखेतली दुर्गंधी घालवणं हाही एक गुण आहे. नाही बसला ना विश्वास? काखेतली दुर्गंधी घालवण्यात खोबरेल तेलही प्रभावी आहे. त्यासाठी काखेमध्ये खोबरेल तेलाने साधारण १५ मिनिटांपर्यंत मसाज करा आणि अर्धा तास ठेवा. अर्ध्या तासानंतर साबण आणि पाण्याने धुवा.
या सोप्या उपायांचं पालन करून तुम्ही काखेतली दुर्गंधी दूर करू शकता. त्यासाठी महागडे परफ्युम्स आणि डिओ मारण्याची गरज नाही. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात पाणी भरपूर पिणं, शरीरातली पाण्याची पातळी कायम राखणं, पाण्याचा अंश भरपूर असलेली कलिंगड, द्राक्षासारखी खास उन्हाळ्यात येणारी फळं खाणं हेही अगदी सोपे आणि सहज शक्य असलेले उपाय आहेत.