Uric Acid: युरिक अॅसिड वाढल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात यूरिक अॅसिड वाढला तर सांध्यांमध्ये भयंकर वेदना होतात, जळजळ होते. जर यूरिक अॅसिडची पातळी वेळेवर कमी केली नाही तर ते आपल्या हाडांच्या सांध्यामध्ये क्रिस्टल्सच्या रूपात जमा होऊ लागतात आणि त्यातून ते संधिरोगाचे रूप घेतात. त्यामुळे शरीरात युरिक अॅसिड वाढल्याची लक्षणं दिसू लागल्यास त्याकडे ताबडतोब लक्ष द्या आणि ते कमी करण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करा.
जर तुम्ही गाढ झोपेत असताना रात्री अचानक जाग येत असेल आणि तुम्हाला श्वसनाचा त्रास होऊ लागला तर त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. २०१८ मध्ये केलेल्या एका संशोधनात असं आढळून आलं आहे की, ज्या लोकांना ही समस्या आहे, म्हणजे स्लीप एपनिया आहे, त्यांना संधिवात होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. स्लीप एपनिया ही एक समस्या आहे ज्यामध्ये झोपलेल्या व्यक्तीला थोडावेळ श्वास घेता येत नाही आणि अचानक उठून तो श्वास घेण्यास सुरुवात करतो. या काळात शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने असे घडते.
स्लीप एपनिया आणि संधिवात यावरील एक संशोधन न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालं आहे. यात स्लीप एपनिया असलेले लोक आणि काही निरोगी लोक सहभागी झाले होते. ६ वर्षांच्या अभ्यासात असं दिसून आलं की, स्लीप एपनिया असलेल्या ४.९ टक्के लोकांमध्ये यूरिक अॅसिड वाढलं होतं आणि त्यांना संधिरोग झाला होता, तर निरोगी लोकांमध्ये ही टक्केवारी खूपच कमी होती.
त्यामुळे जर कोणाला स्लीप एपनियाची समस्या असेल तर आतापासूनच काळजी घेण्याची गरज आहे. स्लीप एपनियामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. रात्रभर झोपूनही झोप न येणे, थकवा आणि आळस, मानसिक आजार, अॅसिडिटी, कमकुवत स्मरणशक्ती इ. सारखे त्रास होऊ लागतात. स्लीप एपनिया टाळण्यासाठी, वजन नियंत्रित करा, योगा करा आणि जॉगींग करा. धूम्रपान आणि अल्कोहोलचे व्यसन सोडा.