प्रत्येकाला आपल्या त्वचेवर कोणताही डाग नसावा, त्वचा मऊ असावी, चमकदार असावी, असे वाटत असते. त्यासाठी आपण अनेकांचे सल्लेसुद्धा ऐकत असतो. कुणी आपल्याला एखादे क्रीम लावून पाहण्यास सांगते, तर कुणी पाणी पिण्यासाठी सांगतात; तर कुणी अजून काहीतरी वेगळ्या टिप्स देत असतात. मात्र, यापैकी काही गोष्टींचा वापर तुम्ही थोडे दिवस करून पाहता, पण कोणताच फरक जाणवला नाही की, सगळ्या गोष्टी सोडून देता. मात्र एक अशी गोष्ट आहे; जी त्वचेसाठी उपयुक्त असून, खिशालाही परवडणारी आहे.
सध्या कोरियन स्किन केअर हे ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे इतरांचे ऐकून रसायनांनी भरलेल्या क्रीम्स किंवा इतर उत्पादने आपल्या चेहऱ्यावर लावण्यापेक्षा घरात दररोज वापरल्या जाणाऱ्या, तांदळाचा वापर करून पाहा. कोरियन लोक राइस वॉटर [तांदळाचे पाणी] हे आपल्या त्वचेला चमकदार ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे वापरत असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखामध्ये म्हटले आहे. आपली त्वचा चमकदार व नितळ ठेवण्यासाठी या राइस वॉटरचा खूप फायदा होतो, अशीही माहिती मिळते. त्यामुळे हा अतिशय सोपा आणि घरगुती उपाय कसा करायचा ते पाहा.
हेही वाचा : फेसपॅक लावताना तुमच्याकडूनही होतात का ‘या’ पाच चुका? त्वचेच्या काळजीसाठी लक्ष द्या या गोष्टींकडे….
चमकदार चेहऱ्यासाठी राइस वॉटर कसे वापरावे?
साहित्य
तांदूळ : एक लहान कप न शिजवलेला तांदूळ घ्या.
पाणी : दोन कप पाणी
कृती
१. सर्वप्रथम भात लावण्यासाठी आपण ज्या पद्धतीने तांदूळ धुतो अगदी त्याच पद्धतीने थंड पाण्याखाली तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. त्यामुळे त्यात असणारे अनावश्यक घटक, किडे निघून जातील.
२. आता एका बाउलमध्ये धुतलेले तांदूळ दोन कप पाण्यामध्ये १५ ते २० मिनिटांसाठी भिजवून ठेवा. तांदूळ भिजवताना हळूहळू पाण्याचा रंग बदलण्यास सुरुवात होईल.
३. १५-२० मिनिटांनी पाण्यातील तांदळाच्या दाण्यांना आपल्या बोटांच्या मदतीने हलकेसे एकमेकांवर घासत वर-खाली करा. त्यामुळे तांदळामध्ये असणारे आवश्यक पोषक घटक पाण्यामध्ये मिसळण्यास मदत होईल.
४. त्यानंतर एका गाळणीच्या किंवा चाळणीच्या साह्याने तांदळातील पाणी गाळून घ्यावे.
५. तुम्हाला या राइस वॉटरचा अधिक फायदा करून घ्यायचा असल्यास, त्यास तुम्ही २४-४८ तासांसाठी साधारण तापमानामध्ये आंबवण्यासाठी [Fermentation] ठेवू शकता. असे केल्याने राइस वॉटर अधिक उत्तम प्रकारे काम करू शकते. तुम्हाला नको असल्यास ही स्टेप नाही केली तरीही चालू शकते.
६. आता हे पाणी तुम्ही एका स्वच्छ आणि हवाबंद झाकणाच्या बरणीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे हे पाणी अधिक काळ चांगले राहील आणि चेहऱ्यावर लावताना थंडावासुद्धा मिळेल.
राइस वॉटर वापरण्याच्या चार पद्धती
१. क्लींजर
एखाद्या कापसाच्या मदतीने या पाण्याने तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता. कापसावर काही थेंब राइस वॉटर घेऊन, हलक्या हाताने आपला चेहरा स्वच्छ करावा. हे एका नैसर्गिक क्लींजरप्रमाणे काम करून, चेहऱ्यावर असणारे नैसर्गिक तेल टिकवून ठेवण्यास मदत करते.
२. टोनर
चेहऱ्यावर कापसाच्या मदतीने राइस वॉटर हलक्या हाताने लावून घ्यावे. या पाण्यात असणाऱ्या पोषक घटकांच्या मदतीने त्वचेची पीएच [Ph] पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा मऊ होते.
३. फेस मास्क
कोरफड, मध किंवा इतर पदार्थ या राइस वॉटरमध्ये मिसळून, त्याचा एक फेस मास्क बनवून घ्यावा. हा मास्क १५ ते २० मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावून नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावा. त्यामुळे चेहरा तजेलदार होऊन, त्यास हायड्रेशन मिळण्यास मदत होते.
४. अंघोळीदरम्यान
तुम्हाला राइस वॉटरचा संपूर्ण त्वचेसाठी पुरेपूर उपयोग करायचा असल्यास, बादलीमध्ये अंघोळीच्या पाण्यात तांदळाचे पाणी म्हणजेच राइस वॉटर घालावे. असे केल्याने तुमच्या संबंध शरीराला याचा फायदा होऊन, तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
[टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित असल्याने, कृपया त्यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]