हिवाळ्यामधील या थंड हवेमुळे आपली त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अशा वातावरणात त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. आपली त्वचा मॉइश्चराइज्ड करण्यासाठी मऊ मुलायम होण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात अनेक पदार्थ असतात. परंतु, अशा गोष्टींकडे आपले पटकन लक्ष जात नाही आणि जरी एखाददुसरी गोष्ट माहीत असली तरीही त्याचा योग्यरीतीने वापर कसा करायचा हे ठाऊक असणे गरजेचे असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकांना दूध किंवा त्यावर येणारी साय ही फारशी पसंत नसते. अनेकदा दुधाच्या सायीला नावे ठेवली जातात; पण याच सायीमुळे तुमच्या चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. सायीपासून बनवलेल्या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते; ज्यामुळे चेहरा नितळ होतो. त्यासोबतच नैसर्गिकरीत्या चेहऱ्याला मॉइश्चराइज्ड करण्यासदेखील मदत होते. असा हा सोपा घरगुती फेस मास्क कसा बनवायचा ते पाहा.

हेही वाचा : घरातील ‘हा’ नेहमीच्या वापरातील पदार्थ त्वचा ठेवेल मऊ अन् चमकदार; पाहा हा घरगुती उपाय

सायीचा वापर करून फेस पॅक कसा बनवावा?

साहित्य

दोन चमचे साय
एक चमचा मध
लिंबाचा रस

कृती

एका बाऊलमध्ये साय घेऊन, त्यामध्ये मध आणि चमचाभर लिंबाचा रस घाला.
सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या.
आता दुधाच्या सायीचा फेस पॅक तयार आहे.

फेस पॅक लावण्याची पद्धत

सर्वप्रथम आपला चेहरा पाण्याचे स्वच्छ धुऊन घेऊन, मऊ टॉवेलच्या साह्याने चेहऱ्यावरील पाणी टिपून घ्यावे.
त्यानंतर तयार फेस पॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्याला एकसमान लावून घ्यावा.
साधारण १५ ते २० मिनिटांसाठी हा पॅक चेहऱ्याला लावून ठेवावा.
त्यानंतर आपल्या चेहऱ्याला काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करावा.
मसाज करून झाल्यावर कोमट गरम पाण्याचा वापर करून, चेहरा स्वछ धुवावा.
पुन्हा एकदा चेहऱ्यावरील पाणी मऊ टॉवेलच्या मदतीने टिपून घ्या. [टॉवेल जोरात चेहऱ्यवर घासू नये]
त्यानंतर गरज वाटल्यास तुमच्या आवडीचे मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावावे.

हेही वाचा : घरामध्ये हेअर स्पा करणे होईल शक्य; चमकदार केसांसाठी ‘या’ सोप्या आणि घरगुती स्टेप्सकडे द्या लक्ष

सायीच्या फेस पॅकमधील घटकांचे फायदे

साय : या फेस पॅकमधील दुधाची साय नैसर्गिकरीत्या तुमच्या चेहरा मॉइश्चराइज करते. हिवाळ्यात आपली त्वचा वारंवार कोरडी पडत असल्याने या पॅकचा उपयोग होऊ शकतो.
मध : या पॅकमधील मध हा घटक तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी किंवा त्यांना कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. त्यासोबतच मधदेखील चेहरा मॉइश्चराइज करण्यास मदत करीत असतो.
लिंबू : दुधाची साय आणि मधासोबत लिंबाचा रस घातल्याने, चेहऱ्यावरील काळपटपणा वा ‘टॅन’ निघून जाऊन, त्वचा उजळण्यास मदत होते.

सायीचा फेस पॅक लावण्यासाठी काही बोनस टिप्स :

तुमच्या त्वचेची गरज लक्षात घेऊन, आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हा पॅक तुम्ही लावू शकता.
तुम्ही हा मास्क सकाळच्या वेळी वापरणार असाल, तर बाहेर जाण्याआधी चेहऱ्याला सनस्क्रीन लावण्यास विसरू नका.
हा फेस पॅक बनवण्यासाठी शक्यतो ताज्या सायीचा वापर करावा. साय ताजी असल्यास त्याचा त्वचेसाठी अधिक फायदा होतो.

[टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use malai face pack for soft and healthy skin try this useful and easy skin care hack dha
Show comments