प्रत्येकाला सुंदर आणि चमकणारी त्वचा हवी असते. यासाठी अनेकजण बाजारात मिळणारी महाग सौंदर्य उत्पादने वापरतात. पण या सौंदर्य उत्पादनांचा फायदा प्रत्येकाला होतोच असं नाही. निरोगी त्वचा मिळविण्यासाठी त्वचेची नैसर्गिक पद्धतीने सुधारणा करण्यात येऊ शकते. यासाठी निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या परिसरात झेंडूच्या फुलांची झाडे असतात. झेंडूचे फूल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-फंगल गुणधर्म त्वचेला घट्ट करण्यासोबतच ग्लो राखण्यासाठी प्रभावी आहेत. उन्हाळ्यात पुरळ उठणे आणि सनबर्न या समस्या झेंडूच्या फुलांनी दूर केल्या जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया झेंडूच्या फुलांचे फायदे.
झेंडू कसे वापरावे ?
झेंडूच्या फुलाचा वापर त्वचेचा रंग दूर करण्यासोबतच घरगुती टोनर म्हणूनही करता येतो. याशिवाय तुम्ही फुलांपासून बनवलेले फेस पॅक आणि हेअर मास्क देखील वापरु शकता.
मुरुमांची समस्या दूर
मुरुमांच्या समस्येला झेंडूची फुले खूप उपयोगी आहेत. यासाठी , ३ ते ४ झेंडूची फुले घ्या, ती चांगली स्वच्छ करा आणि त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडे दही घालून चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. धुण्याआधी चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकाव करा आणि गालांना बोटांनी मसाज करा. चेहऱ्यावर जास्त पिंपल्स असतील तर आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल आणि पिंपल्सपासून देखील सुटका होईल.
टोनर बनवा
टोनर बनवण्यासाठी झेंडूची ५-६ फुले स्वच्छ करून एक ते दीड कप पाण्यात उकळा. पाणी अर्धवट राहिल्यावर ते गाळून थंड करा आणि त्यात २ चमचे कोरफड जेल घाला. हे दोन्ही चांगले मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरून वापरा. आता तुम्ही हे घरघुती टोनर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर स्प्रे करू शकता.
झेंडू आणि तांदूळ स्क्रब
घरघुती स्क्रब बनविण्यासाठी झेंडूच्या फुलाच्या रसात किंवा पेस्टमध्ये तांदळाचे पिठ तसंच १ चमचा मध मिसळा. यामुळे त्वचेच्या कोरडेपणाची समस्या दूर होईल. आठवड्यातून एक किंवा दोनदा हा उपाय करा.
(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आवशक्यता असल्यास नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)