आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी किंवा घर सुगंधी राहण्यासाठी सध्या बाजारात विविध प्रकारच्या सेंटेड कँडल्स उपलब्ध आहेत. या मेणबत्यांचा सुगंध हा मनावरील ताण कमी करण्यासाठी, मूड चांगला होण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी उपयोगी असतो असं म्हटलं जातं. या मेणबत्यांमध्ये गुलाब, लव्हेंडर, मोगरा अश्या फुलांचा सुगंध असतो; तर कलिंगड, स्ट्रॉबेरी, संत्र यांसारख्या फळांच्या सुगंधाच्या मेणबत्यादेखील उपलब्ध असतात. पण, बाहेर मिळणाऱ्या या सेंटेड कँडल्स सगळ्यांनाच परवडतील असे नाही. त्यामुळे घरातील केवळ दोन वस्तू वापरून आपण बाहेर मिळतात तशा सेंटेड कँडल्सऐवजी सुगंधी दिवे बनवू शकतो. विशेष म्हणजे हे दिवे पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरकदेखील आहेत.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर हा घरगुती सुगंधी दिवा कसा बनवायचा, याचा व्हिडीओ @rohina या हँडलरने शेअर केला आहे. घरात, अगदी पाच मिनिटांत तयार होणारा हा सुगंधी दिवा कसा तयार करायचा पाहा.
संत्र्यापासून बनवा सुगंधी दिवा :
१. संत्र्याचा दिवा बनवण्यासाठी आधी एक मोठ्या आकाराचे संत्र घ्या. त्याच्या देठाकडच्या भागापाशी थोडी जागा सोडून सुरीने गोल आखून घ्या. त्या आकाराच्या मदतीने संत्र्याचे साल सोलून घ्या. असेच खाली उरलेल्या सालासोबतदेखील करा. संत्र्याची सालं सोलताना, सालाच्या आतील भागात पांढऱ्या रंगाच्या धाग्यासमान जे मऊसर टोक असते ते तुटणार नाही याची काळजी घ्या. संत्र्याची सालं सोलल्यानंतर त्यांचा आकार एखाद्या वाटीसारखा दिसायला हवा.
हेही वाचा : दिवाळीचा फराळ आणि मिठाई खाऊन शरीर झालेय सुस्त? पाहा हे सात सोपे उपाय करतील तुम्हाला तंदुरुस्त
२. संत्र्याच्या सालीचा छोटा भाग, सालीच्या मोठ्या भागाच्या आत ठेवा आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तेल म्हणजेच खोबरेल, तीळ, ऑलिव्ह तेल इत्यादी घाला.
३. आता संत्र्याचा जो धाग्यासमान मऊसर भाग असतो तो काडेपेटीने पेटवा. तयार आहे तुमचा संत्र्याच्या सुगंधाचा दिवा.
या दिव्यामुळे घरात संत्र्याचा मंद सुगंध दरवळून, घराचे वातावरण अतिशय प्रसन्न होते. त्याचसोबत मनावरची सर्व मरगळदेखील दूर होण्यास मदत होते. @rohina या इन्स्टाग्राम हँडलरने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितल्यानुसार हा सुगंधी दिवा साधारण दोन तास टिकतो.