व्हॅलेंटाइन डे म्हटलं की आपल्या लाडक्या व्यक्तीला काहीतरी गिफ्ट द्यावं असा विचार सगळयांच्याच डोक्यात सुरु होतो. मग या व्यक्तीच्या आवडीनिवडी, त्याची गरज आणि आपले बजेट यांचे गणित मांडणे सुरु होते. हल्ली आपल्याला सर्वच गोष्टी रेडिमेड हव्या असतात. त्यामुळे स्वतः काही तयार करून गिफ्ट द्यायचे दिवस कधीच निघून गेले आहेत. काही जोडप्यांना महाग दागदागिने किंवा कपडे खरेदी करणे, चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाणे आवडते. तसेच एकमेकांना फुले व चॉकलेट्स देण्याचा पर्यायही अनेक जण निवडतात. काही जण आपल्या खास व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी आधीपासून तयारी करतात तर काही जण ऐनवेळी जागे होतात. अशा ऐनवेळी काय गिफ्ट द्यावे असा प्रश्न पडलेल्या तमाम जनतेसाठी गिफ्टचे काही खास पर्याय…
१. वॉलेट किंवा पर्स – वॉलेट किंवा पर्स हा आपल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये अगदी बजेट पासून ते ब्रँडेडपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या व्हॅलेंटाइनची रंगाची, आकाराची आणि इतर आवड लक्षात घेऊन याची खरेदी करता येऊ शकते.
२. गिफ्ट किट – बॉयफ्रेंडला गिफ्ट द्यायचे असल्यास हल्ली शेविंग कीट हाही एक उत्तम पर्याय ठरु शकतो. याशिवाय टाय, वॉलेट, पर्फ्युम, घड्याळ, किचेन असे वेगवेगळे सेट बाजारात उपलब्ध असतात. मुलींसाठीही अशाप्रकारे वॉलेट, पर्फ्युम, सौंदर्यप्रसाधने असे कीट देता येऊ शकतात.
३. दागिने – मुलीला गिफ्ट देणे तुलनेने सोपे असते असे म्हणतात. तिच्या आवडीनिवडीनुसार तिला ब्रेसलेट, कानातले, गळ्यातले असे काही खास दिल्यास ती सहज खुश होते. तर मुलांसाठीही ब्रेसलेट, चेन, अंगठी असे पर्याय दागिन्यांमध्ये उपलब्ध असतात. यामध्ये तुम्ही बजेटनुसार चांदीपासून ते वेगवेगळ्या मटेरीयलमध्ये वस्चू खरेदी करु शकतात.
४. कपडे – आपल्या व्हॅलेंटाइनची आवड साधारणपणे आपल्याला माहित असते. त्याला किंवा तिला आवडतील असे नवीन फॅशनचे कपडे एकमेकांना देणे हाही एक उत्तम पर्याय असू शकतो.
५. घड्याळ, हेडफोन्स, गॉगल – सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. त्यापैकी एखाद्या चांगल्या कंपनीचे हेडफोन्स, घड्याळ किंवा गॉगल आपल्या बजेटनुसार देण्याचा पर्यायही तुम्ही निवडू शकता. ही वस्तू नियमीत वापरण्यासाठी उपयुक्त आणि लक्षात राहील अशी असल्याने भेटवस्तू म्हणून हा उत्तम पर्याय आहे.
६. चॉकलेट, केक, बुके – चॉकलेट आणि केक हे सर्वांनाच आवडणाऱ्या गोष्टी असतात. प्रेमाचे प्रतिक असलेल्या या गोष्टी एकमेकांना देऊन प्रेम द्विगुणित करण्यास मदत होते. बाजारात व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या आकारातील केक आणि चॉकलेट उपलब्ध असतात, त्यांचा तुम्ही निश्चितच विचार करु शकतात.