Happy Hug Day 2024 : आपल्या जोडीदाराला मिठीत घेण्याच्या भावनेपेक्षा अधिक सुंदर भावना काय असू शकते? जी शब्दांतून व्यक्त करता येत नाही. त्या भावना एका मिठीतून व्यक्त करता येतात. काही न बोलता, भावना व्यक्त करण्याचे मिठी हे प्रभावी माध्यम आहे. खूप तणावात असताना, खूप चिंतेत किंवा अडचणीत, दु:खात असताना आपल्या प्रिय व्यक्तीने मिठी मारली की, स्वत:ला मोठा मानसिक आधार मिळतो. त्यामुळे मिठी ही एक सुखदायक भावना आहे. यंदा व्हॅलेंटाइन डेच्या दोन दिवस आधी म्हणजे १२ फेब्रुवारीला ‘हग डे’ साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने आपण मिठी मारण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊ…
या ‘हग डे’ला तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर तुमच्या आई, वडील, भाऊ, बहीण यांनाही एक प्रेमळ मिठी मारू शकता. कारण- एखाद्याला मिठी मारल्याने एक सुंदर अनुभव तर मिळतोच; त्याशिवाय आरोग्यासाठीही अनेक फायदे मिळतात. याच मिठी मारण्याच्या फायद्याविषयी सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मेहेझाबिन दोर्डी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
सायकोलॉजिस्ट मेहेझाबिन दोर्डी यांच्या मते, मिठी मारल्यामुळे शरीरात ऑक्सिटोसिनची पातळी वाढते; ज्याला लव्ह हार्मोन आणि बाँडिंग हार्मोन, असे म्हणतात. हे हार्मोन्स सामाजिक बंध, भावना निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्याने मिठी मारल्यानंतर शरीरात ऑक्सिटोन्सची पातळी वाढते; ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सहानुभूतीची भावना निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे ताण कमी होऊन हृदयाचे आरोग्य चांगले ठेवता येते.
मिठी मारण्याचा शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
१) वेदनेपासून आराम : शारीरिक स्पर्श, जसे की मसाज किंवा अगदी साधी मिठी, शरीरात एंडोर्फिन हार्मोन सोडण्यास उत्तेजित करू शकते; जे नैसर्गिकरीत्या वेदनाशामक म्हणून काम करते. हे वेदनेची जाणीव कमी करण्यास आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते.
२) ताणतणावाच्या तीव्रतेत घट : मिठीतील शारीरिक स्पर्शामुळे ऑक्सिटोसिन हार्मोनचे उत्सर्जन होते. हा हार्मोन जो कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी कमी करू शकतो आणि तणाव कमी करू शकतो. बऱ्याच काळापासून जाणवणारा तणाव विविध आरोग्य समस्यांशी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत मिठी मारल्याने तणाव कमी होतो. त्याशिवाय निरोगी आरोग्य राखण्यास मदत होते.
३) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ : संशोधनातून असे दिसून आले की, मिठीसारख्या सकारात्मक शारीरिक संवादामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. त्यामध्ये तणाव कमी होणे आणि ऑक्सिटोसिन हार्मोन्स सोडणे या गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात.
४) हृदय व रक्तवाहिन्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योगदान : शारीरिक स्पर्श, विशेषतः मिठी मारल्याने रक्तदाब आणि हृदयाची गती कमी होऊ शकते. कालांतराने या बाबी हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यासाठी चांगले योगदान देऊ शकतात.
मिठी मारण्याचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
१) मूडमध्ये सुधारणा : शारीरिक स्पर्श; जसे की मिठी मारण्यामुळे एंडोर्फिन हार्मोन्स सोडले जातात. ते मूड सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते आणि एकूण आरोग्य सुधारते. हा मूड सुधारण्याचा नैसर्गिक मार्ग आहे.
२) चिंता आणि नैराश्य कमी : मिठी व शारीरिक स्पर्श यांमुळे आराम आणि भावनिक आधार मिळू शकतो. चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी करण्यासाठी ही क्रिया विशेष फायदेशीर असू शकते. कारण- ती बंध निर्माण करते आणि सुरक्षिततेची भावना वाढवते.
३) समजून घेण्याची भावना : स्पर्श हे संवादाचे शक्तिशाली साधन आहे. ते प्रेम, सहानुभूती आणि समजून घेण्याची भावना समोरच्यापर्यंत पोहोचवते; जी नाते तयार करण्यासाठी आणि टिकविण्यासाठी आवश्यक असते. भावनिक आरोग्यासाठी चांगले सामाजिक बंध निर्माण केले पाहिजेत.
४) तणावाचे व्यवस्थापन : नियमित शारीरिक स्पर्श हा तणावाचे व्यवस्थापन करण्याचे साधन म्हणून काम करू शकतो. हे साधन तणावामध्ये शरीराच्या प्रतिक्रिया नियंत्रित करू शकते आणि रोजच्या आयुष्यातील समस्यांचा सामना करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे भावनिक आरोग्यावर दीर्घकालीन तणावाचा प्रभाव कमी होतो.
तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना मिठी मारताना आलिंगनाची उपचारात्मक शक्ती विसरू नका.त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला संधी मिळेल, तेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रेमळ मिठी मारा. यामुळे तुमच्यात एक सकारात्मक भावना तर निर्माण होईलच; पण त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यावर खोलवर परिणाम जाणवू शकतो.