स्वयंपाकघर हा कोणत्याही घरातील सर्वात महत्वाचा भाग असतो. तुमच्या घराचं मानसिक- शारीरिक आरोग्य, घरातील प्रेम-जिव्हाळा हे तुमच्या किचन मध्ये नेमकं काय शिजतंय यावर ठरत असतं. जेव्हा किचन मध्ये पौष्टिक अन्न शिजवले जाते तेव्हा संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही तुमचे किचन कसे सजवता हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा किचनचे बांधकाम करताना आपण दिशा बघून संपूर्ण रचना करून घेतो, पण केवळ बांधणीच नाही तर तुमच्या किचन मधील रंगसंगती सुद्धा वास्तूनियमानुसार असणे महत्त्वाचे आहे. तुमचे किचन सुंदर आणि प्रसन्न दिसेल असे कोणते रंग आहेत जाणून घेऊयात…
वास्तु तज्ज्ञांच्या माहितीनुसार, स्वयंपाकघरात नेहमी चैतन्य दर्शवणारे रंग असावे, अगदी गडद किंवा अगदीच फिकट रंगांमुळे जेवण बनवणाऱ्या व्यक्तीला आनंदी वाटत नाही परिणामी जेवणातील पोषण तुम्ही अन्न ग्रहण करताना शरीरापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे घरातील इतर खोल्यांइतकेच किंबहुना किंचित अधिक लक्ष आपण किचनची रंगसंगती निवडताना द्यावे.
वास्तु शास्त्रानुसार, किचन मध्ये प्रसन्न मूड ठेवणारे ५ रंग
केशरी: केशरी रंग व त्याच्या अनेक छटा या सकारात्मकता, प्रेम वाढवून घरातील एकूणच वातावरणाला प्रसन्न करते देते. तुमच्या किचनसाठी हा रंग उत्तम निवड ठरू शकतो. तुम्ही हा रंग दक्षिण-पूर्व असलेल्या स्वयंपाकघरातील रचनेसाठी वापरल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते.
हिरवा: हिरवा रंग शांतता आणि प्रेमाचे प्रतीक आहे. यामुळे तुमच्या स्वयंपाकघरला एक परिपूर्ण सुखदायक वातावरण देते. हिरवा रंग निसर्गाचे प्रतिबिंब मानला जातो, हिरव्या रंगाच्या अगदी गडद छटा निवडू नका, तुमच्या वास्तूच्या रंगाला साजेश्या पेस्टल छटा सुद्धा खुलून दिसतील.
पांढरा: पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात हलका रंग हवा असेल तर पांढरा रंग किंवा त्याच्या क्रीम छटा निवडू शकता. . वास्तुशास्त्रानुसार, वायव्य दिशेकंदील स्वयंपाकघर पांढर्या रंगात रंगवणे अधिक फायदेशीर ठरते.
पिवळा: पिवळा हा वास्तुशास्त्रानुसार सर्वोत्तम रंगांपैकी एक आहे. सकाळच्या सूर्योदयाप्रमाणे हा रंग प्रसन्न आणि आनंदी वातावरणाचे प्रतीक आहे. एक उत्साही वातावरण निर्मिती करण्यास हा रंग मदत करतो.
गुलाबी: गुलाबी हा प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जातो. हा रंग दृष्टीक्षेपात येताच प्रेमळ भावना अधिक जागृत होतात. कुटुंबासाठी प्रेमाने जेवण तयार करत असताना हा रंग डोळ्यासमोर असणे कधीही उत्तम ठरेल.
जर का आपण नीट विचार केलात तर हे रंग कोणत्याही अन्य रंग संगतीला साजेसे आहेत त्यामुळे तुम्ही जरी केवळ किचनचे रंगकाम करण्याचा निर्णय घेतला तरी तुमच्या घरातील अन्य लुकला काहीही धक्का लागणार नाही.
(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)