Vastu Tips: वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने आपण घरात सुख आणि शांती आणू शकतो. बऱ्याच वेळा आपण यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण तरीही घरात शांतता मिळत नाही आणि कलह कायम दिसून येतो. वास्तुनुसार घरातील काही वास्तु दोषांमुळे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकदा घरातील वास्तू दोष हे दारिद्र्याचं कारण असू शकतं. वास्तुशास्त्रात अशा अनेक उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्याचा वापर करून आपण घराची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतो.
घरात ५ तुळशीची रोपे लावा: घरातील बाल्कनीमध्ये तुळशीची रोपे लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. वास्तुनुसार तुळशीची झाडे गच्चीवर लावू नयेत. यामुळे तुमच्या कुंडलीतील बुध स्थान कमजोर होतं. जर कुंडलीत बुध कमकुवत असेल तर धन आणि बुद्धिमत्तेचे नुकसान होऊ शकतं. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, बाल्कनीच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला तुळशीची पाच रोपे लावावीत. यामुळे घरात आर्थिक बळ येते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात.
घराच्या या दिशेला आरसा ठेवा: वास्तुमध्ये सांगितले आहे की, आरसा घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा. जर आपण दक्षिण किंवा पश्चिम दिशेने आरसा ठेवला तर तो घरातील सदस्यांच्या विकासात अडचण निर्माण करतो आणि आर्थिक अडचणींचा सामना देखील करू शकतो.
घरात हवा आणि प्रकाश असावा: वास्तुशास्त्रात असा उल्लेख आहे की घरात पुरेशा खिडक्या असाव्यात ज्याद्वारे घरात सूर्यप्रकाश आणि हवा येऊ शकते. यामुळे शारीरिक रोग दूर होतात आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं.
काटेरी आणि शोभेच्या बनावट झाडे घरात लावू नका: आपण ज्या प्रकारची झाडे घरात लावतो ती आपल्या आनंदाशी संबंधित असतात. जर तुम्ही घरात सजावटीसाठी बनावट झाडे लावली असतील तर ती काढून टाका. दूध देणारी आणि काटेरी झाडे घराबाहेर ठेवा. घरात हिरवी झाडे लावा. यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं.
गळक्या नळाने पैशाचं नुकसान होऊ शकतं: अनेक वेळा घरातील नळांमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी टपकत राहतं आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वास्तुनुसार असं करणं चुकीचं आहे. शक्य तितक्या लवकर घरातील गळके नळ दुरूस्त करा, अन्यथा पैशाचं नुकसान होऊ शकतं. गळक्या नळामुळे पाण्याचा अपव्ययही होतो, जो योग्य नाही.