Easy Tips To Buy Cut And Clean Jackfruit : वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेत पाच फळांना फार महत्त्व असते. त्यात आंबा, करवंद, जांभूळ, फणस, केळे या फळांचा समावेश असतो. वडाची पूजा केल्यानंतर सर्व महिला एकमेकींना वाण म्हणून काळ्या मण्यांच्या माळेसह फळांनी भरलेले पान देऊन पाया पडतात. या दिवसांत बाजारात ही पाचही फळं पाहायला मिळतात. त्यातील आंबा, करवंद, जांभूळ, केळे ही फळे आपण सहज ओळखून घेऊन शकतो. पण, फणस विकत घेताना बहुतांश व्यक्तींचा गोंधळ होतो आणि नेमका समोर असलेल्या फणसांतील नेमका कोणता निवडावा ते समजत नाही.
त्यात पावसाळ्यात फळे कमी असतात. त्यामुळे फणसाला अधिक महत्त्व येते. व्यापारी लोक कोकणासह कर्नाटक, केरळ, पाँडिचेरी या भागांतील खेडोपाडी हिंडून १०-१५ रुपयांना फणसाचा एक नग या दराने फणसाची घाऊक खरेदी करतात आणि पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांत नेऊन, १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीने विकतात. शहरात फणसासाठी जास्त किंमत मोजावी लागत असल्याने लोकही घेताना १० वेळा विचार करतात.
फणस विकत घेतल्यानंतर तो पिकलेला वा गोड निघेल की नाही, विकत घेतल्यानंतर पैसे तर वाया जाणार नाहीत ना? असे अनेक प्रश्न मनात गोंडा घालत राहतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला फणस विकत घेताना प्राथमिकदृष्ट्या काय काळजी घ्यावी याची माहिती देणार आहोत. तसेच कापा आणि बरका फणस कसा ओळखावा हेही आपण जाणून घेऊ…
फणस विकत घेताना काय काळजी घ्यावी?
१) फणस कोणताही असला तरी तो कापल्याशिवाय गोड आहे की नाही ते समजू शकत नाही. अशा वेळी फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही ओळखीच्या विक्रेत्याकडूनच फणस खरेदी करा.
२) पिकलेला फणस ओळखण्याचा सर्वांत सोपा पर्याय म्हणजे त्याला येणारा वास. पिकलेल्या फणसाला खूप जास्त सुवास येत असतो. त्याच्या घमघमणाऱ्या सुवासावरूनही फणस पिकला आहे वा नाही हे तुम्ही ओळखू शकता.
३) फणस कडक आहे की मऊ ते तपासून बघा. लगेच खाण्यासाठी पाहिजे असल्यास थोडा मऊ जाणवणारा फणस घ्या.
हेही वाचा – वटपौर्णिमेच्या वाणात ‘ही’ पाच फळंच का ठेवली जातात? काय आहे महत्व? घ्या जाणून
४) फणसाच्या विविध प्रकारच्या जाती असतात. त्यानुसार त्यांची वेगवेगळी चव असते. पण, त्यातून तुम्हाला चांगला फणस निवडायचा असेल, तर नेहमी मध्यम आकाराचा फणस निवडा. कारण- काही वेळा फळ खूप मोठे असते; पण त्यात तितका गोडवा नसतो.
५) हिरवा आणि पिवळसर रंगाचा फणस खरेदी करा. कारण- एकदम फिकट, काळपट दिसणारा फणस आतून खूप पिकलेला किंवा खराब असू शकतो.
६) फणस बोटाने वाजवून बघितल्यानंतर तो पिकला आहे की कच्चा ते ओळखता येते; पण फणसाची पिकलेपणाची ही खूण फणसाबाबत विशेष माहिती असणारी थोडीफार जाणकार व्यक्तीच ओळखू शकते.
कापा आणि बरका फणस कसा ओळखावा?
१) बरका फणस
बरका ही फणसाची एक जात आहे. या फणसाचे काटे थोडे आखूड आणि पसरट असतात. या फणसातील गरे रसाळ, गिळगिळीत; पण चवीला फार मधुर असतात. हा फणस प्रामुख्याने कोकणात आढळतो. बरक्या फणसाचे गरे आकाराने थोडे लहान आणि काप्यापेक्षा जास्त चिकट असतात.
२) कापा फणस
कापा हीदेखील फणसाची एक जात आहे; जी कोकणासह केरळ, कर्नाटक अशा अनेक राज्यांत पाहायला मिळते. मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोकणासह याच राज्यांतून मोठ्या प्रमाणात कापे फणस दाखल होत असतात. या फणसाचे गरे घट्ट असतात. या फणसाचे काटे लांबट आणि रुंदीला थोडे आखूड असतात. हा फणस बरक्या फणसापेक्षा थोडा कमी गोड असतो.