कामाच्या ठिकाणी प्रत्येकालाच तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कार्यालयात छोटय़ा कालावधीचा व्हिडीओ गेम खेळून हा ताण कमी करणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. तसेच अशा प्रकारच्या इतर उपक्रमांद्वारे कर्मचाऱ्यांमधील कार्यक्षमता वाढविणे शक्य असल्याचेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
सततच्या कामामुळे तणाव, निराशा आणि चिंता हा त्रास बहुसंख्य लोकांना होतो. सुरक्षा क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांमध्ये हा त्रास मोठय़ा प्रमाणात आढळतो. अशा वेळी त्यांनी कार्यालयात काही मिनिटे व्हिडीओ गेम खेळल्यास हा तणाव कमी करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे गेम खेळल्यामुळे कार्यक्षमतेतही वाढ होत असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. अमेरिकेतील ‘ सेंट्रल फ्लोरिडा’ विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत ६६ सहभागींवर संशोधन केले असून त्यांना कामाच्या ठिकाणी पाच मिनिटांची विश्रांती देण्यात येत होती. या विश्रांतीच्या काळात सहभागी व्हिडीओ गेम खेळत आणि त्यानंतर त्यांची चाचणी केली जात असे.
व्हिडीओ गेम खेळल्यानंतर ताण-तणावात मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याचे दिसून आले. तर व्हिडीओ गेम न खेळणाऱ्यांच्या तणावात किंचितसा फरक पडल्याचे संशोधकांनी मांडले आहे. हे संशोधन ‘ह्य़ुमन फॅक्टर्स’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.