How To Clean Exhaust Fan: हल्ली प्रत्येकाच्याच घरी निदान दोन तरी एग्जॉस्ट फॅन असतातच. फोडणी देताना, किंवा एखादा पदार्थ तळताना तयार होणाऱ्या गरम वाफा व गंध घरातून बाहेर फेकून वातावरण फ्रेश करण्यासाठी हे फॅन आवश्यक असतात. पण अनेकदा किचनमध्ये लावलेल्या एग्जॉस्ट फॅनची अवस्था दयनीय झालेली असते. साहजिकच आहे, तुम्ही फोडण्या देताना कधी तेल, किचन झाडताना कधी धूळ असे कित्येक कण एग्जॉस्ट फॅनच्या जाळीत अडकण्याची शक्यता असते. त्याशिवाय या फॅनच्या पाती सुद्धा चिकट व काळपट पडू लागतात. एखाद्या वेळेस तुम्ही घरातील अन्य सिलिंग फॅन आठवड्यात एकदा पुसून काढायचे परिश्रम घ्यालही पण एग्जॉस्ट फॅन इतक्या लहानश्या जागेत असतो की तिथे स्वच्छता करायची तरी कशी हा प्रश्न पडतो. आज आपण त्यासाठीच काही सोपे उपाय पाहणार आहोत.
एग्जॉस्ट फॅनची जाळी कशी स्वच्छ कराल?
एग्जॉस्ट फॅनची जाळी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सरळ गरम पाणी किंवा डिटर्जंटचा वापर करू शकता. चिकटपणा अगदीच घट्ट असेल तर अमोनिया किंवा ब्लिचही वापरू शकता. गरम पाण्यात अर्धा कप ब्लिच मिसळून एक पेस्ट तयार करा आणि त्यात एग्जॉस्ट फॅनची जाळी बुडवा. तासभर ही जाळी पाण्यात भिजवून ठेवल्याने त्याला लागलेली घाण आणि चिकटपणा कमी होईल.
एग्जॉस्ट फॅनच्या पाती कशा स्वच्छ कराल?
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एग्जॉस्ट फॅनच्या पाती कशा साफ कराव्यात? पाणी आणि साबण यांचे मिश्रण तयार करा.मायक्रो फायबर कापड वापरून तुम्ही फॅन पुसून घेऊ शकता. डाग अगदीच चिवट असल्यास तुम्ही १/४ अमोनिया, २ चमचे बेकिंग सोडा आणि १ कप कोमट पाणी असेही मिश्रण तयार करू शकता. तुम्ही हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे करू शकता व यानंतर तारेच्या काथ्याने एक्झॉस्ट फॅन ब्लेड घासून स्वच्छ करू शकता. यावेळी हातात ग्लोव्हज घालायला विसरु नका.
@Dimple’s Family and Kitchen या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या काही हॅक सुद्धा आपण पाहूया..
हे ही वाचा<< कंगवा वापरून पावसाळ्यात कपडे सुकवायचा भन्नाट जुगाड; अंतर्वस्त्रांसाठी तर सगळ्यात बेस्ट उपाय
जर तुम्ही मुळात पंधरवड्यातून एकदा यापद्धतीने फॅन्स स्वच्छ करत असाल तर ते प्रमाणाच्या बाहेर खराब होण्याची शक्यताच कमी होते. पण तुमच्या फॅनची अवस्था अगदीच बिकट असल्यास तुम्हाला सोडियम फॉस्फरेट सारखे केमिकल वापरावे लागू शकते. याशिवाय जर तुमच्याकडे लहानसा स्टीमर असेल तर त्यानेही तुम्ही चिकट डाग मऊ करू शकता आणि मग साध्य मायक्रो फायबर कापडाने पुसून काढा.