आपले आरोग्य चांगले रहायचे असेल तर उत्तम आहार आणि व्यायाम याच्याशिवाय पर्याय नाही. सध्या जीवनशैलीतील हेच घटक काहीसे बिघडले असल्याचे आपल्याला दिसते. आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू नये यासाठी प्रतिकारशक्ती चांगली असणेही आवश्यक असते. आयुर्वेदात प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अनेक औषधी पदार्थ सांगितले आहेत. च्यवनप्राश हे त्यापैकीच एक. मागच्या काही काळात इतर पदार्थांप्रमाणेच यामध्येही विविध कंपन्यांत स्पर्धा सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. अशावेळी औषध म्हणून घेत असलेले च्यवनप्राश कितपत चांगले आहे हे समजेनासे होते. अशावेळी घरच्या घरी च्यवनप्राश बनवता येत असेल तर? च्यवनप्राशची अशीच एक सोपी रेसिपी जाणून घेऊया…
हे एक उत्तम टॉनिक आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांसाठी च्यवनप्राश अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी आवश्यक असणारे घटकही आयुर्वेदीक असतात. आवळा हा यातील मुख्य घटक असतो. हा आवळा आयुर्वेदीक काढ्यामध्ये घालून शिजवला जातो. आवळ्याच्या प्रत्येक कणाला हे काढ्याचे गुणधर्म लागायला हवेत. ३८ वनस्पतींचा हा काढा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. दशमूल भरड जवळपास १० मूळांचे मिश्रण, अश्वगंधा भरड, शतावरी भरड, विदारीकंद भरड, पाडळमूळ भरड, काळ्या मनुका, बेलमूळ भरड, जांभळी मूळ भरड, नागकेशर, बलामूळ भरड, कमलकंद, करर्पूरकचोरा, हिरडा, कचोरा, मंजिष्ठा, एरंडमूळ, सारिवा, गुळवेल, विदारीकंद हे पदार्थ असतात. हे सर्व पदार्थ साध्या पाण्यात उकळून घ्यावेत. पिठवण, शिवणमूळ, सालवण, टेंटीमूळ हेही घ्यावे.
रात्रभर साधारण एक किलो आवळे पाण्यात भिजवून ठेवावेत. यासाठी ३ लिटर पाणी लिटर करावे. हा काढा मंद अग्नीवर ठेवावा. त्यात भिजवलेला आवळा ठेवावा. हे चांगले शिजू द्यावे. हे सगळे हलवून गाळून घ्यावे. हा मावा नंतर तूपावर मंद अग्नीवर भाजून घ्यावा. शक्यतो निर्लेपच्या कढईत खमंग वास येईपर्यंत भाजावे. लोखंडी कढईत भाजू नये. यानंतर साखरेचा पाक तयार करावा. साधारण २५ ते ३० टक्के साखर घेऊन पाक करावा. हा पाक घट्ट करावा आणि त्यात भाजलेला आवळ्याचा मावा घालावा. वंशलोचक, दालचिनी, वेलची, तमालपत्र, नागकेशर, मध आणि पिंपे त्यात घालावे. यात केशर घातल्यास आणखी चांगले. हे मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे. मग हे मुरायला ठेवावे. जितके जास्त मुरेल तितके चांगले.