Dry Leaves Gardening Hacks In Marathi: घर कितीही लहान असलं तरी दारात- खिडक्यांमध्ये एखादं सुंदर रोप असावं अशी सर्वांचीच इच्छा असते. सकाळी उठताच दिसणारी हिरवळ मनाला सुखावून जाते. हौस कितीही असली तरी काही वेळा घाई गडबडीत या रोपांना पाणी देणं, त्यांना पुरेसं ऊन लागतंय का हे पाहणं, खत टाकून माती वर-खाली करणं हे सगळे सोपस्कार राहून जातात. आणि मग प्रेमाने वाढवलेली, सुखावणारी रोपं सुकायला सुरुवात होते. वेळेआधीच पाने पिवळी पडू लागतात काही वेळातर चक्क सुकून कुस्करली सुद्धा जातात. आज आम्ही तुम्हाला गडबडीत झालेली चूक सुधारण्यासाठी एक सोपा जुगाड सांगणार आहोत. अवघ्या २०० मिली पाण्याचा हा जुगाड तुमच्या सुकून पडलेल्या रोपांना नव्याने बहर आणून देण्यास खूप मदत करू शकतो.
@gardening99 या इन्स्टाग्राम पेजवर रोपांना हिरवेगार करण्यासाठीची टीप शेअर करण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला पाणी, साखर, पांढरं व्हिनेगर व एक स्प्रे बॉटल इतकंच गरजेचं आहे. तुम्हाला सर्वात आधी पाण्यात अर्धं झाकण पांढरं व्हिनेगर मिसळायचं आहे आणि मग त्यात दोन चमचे साखर घालून नीट ढवळून घ्यायचं आहे. काही वेळ ठेवून मग हे द्रावण तुम्हाला स्प्रे बॉटलमध्ये भरायचे आहे. हे पाणी तुम्हाला रोपाच्या मुळाशी व पानांवर स्प्रे करायचे आहे. व्हिनेगरमुळे रोपाच्या मुळांची माती जंतुरहित होते तसेच साखरेमुळे पानांचा रंग टिकून राहण्यास मदत होते.
हे ही वाचा<<तुळशीचं रोप पाणी देऊनही सुकतंय? मातीत रोप लावताना ३० टक्के ‘ही’ गोष्ट मिसळा, लहान कुंडीतही येईल बहर
दरम्यान, हा प्रयोग तुम्हाला निदान २० दिवस तरी करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला प्रभाव दिसून येऊ लागेल. तसेच तुम्ही रोपं कुंडीत लावल्यानंतर निदान एखाद्या दिवसाच्या अंतराने तरी अशा प्रकारे पाणी स्प्रे करायला हवे ज्यामुळे पाने सुकण्याची प्रक्रियाच पुढे ढकलली जाईल. तुम्हाला हा उपाय कसा वाटला आणि त्याचा प्रभाव कसा वाटतोय हे कमेंट करून नक्की कळवा.