How to Grow Tulsi Plants Faster Video: जून व जुलै महिन्यात तुळशीच्या रोपाची वाढ झपाट्याने होत आहे. वातावरणात आर्द्रता असल्याने आपण या पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये तुळशीच्या बियाणांपासून किंवा कटींग (एक फांदी रोवून) तुळस वाढवू शकता. पावसामुळे एकूणच रोपाची वाढ पटापट होऊ शकते पण याच महिन्यांमध्ये आणखी एक धोका असतो तो म्हणजे रोपांना सततच्या ओलाव्यामुळे बुरशी लागू शकते. अशावेळी आपण एक उपाय करून आपल्या रोपाला कीटकांपासून सुरक्षित ठेवू शकता. तसेच छान डेरेदार हिरवीगार तुळस वाढण्यास सुद्धा या खत स्वरूपातील उपायाची मदत होऊ शकते. आपल्याला यासाठी कडुलिंबाचा पाला व एक मॅजिक पदार्थ वापरायचा आहे. या पाल्याचा वापर कसा करायचा? तुळशीची एकंदरीतच कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया..
तुळशीच्या मंजिरी का काढाव्या?
सर्वात आधी आपण तुळशीची कशी काळजी घ्यायची हे पाहूया. आपल्याला अनेकदा असं वाटतं की रोपाला खत पाणी दिलं की आपलं काम झालं आणि मग रोप वेगाने वाढायला हवं. पण याउलट तुम्हाला वेळोवेळी एखाद्या रोपाची छाटणी करणं सुद्धा आवश्यक असतं. तुळशीच्या बाबत सांगायचं तर, तुळशीवर वाढणारी मंजिरी आपल्याला वेळोवेळी काढून टाकायला हवी. कारण या मंजिरीच्या रूपात जे बी वाढत असते अनेकदा रोपाची सगळी शक्ती ही या बियांना पोषण पुरवण्यातच जाते परिणामी रोपाची वाढ खुंटते. अशावेळी मंजिरी काढून टाकल्याने रोपाच्या प्रत्येक भागाला आवश्यक तितके पोषण मिळून वाढ होऊ शकते. या मंजिरी काढल्यावर फेकून देण्याची काही गरज नाही उलट आपण त्या मंजिरी पाण्यात घालून उकळून- गाळून तो काढा प्यायल्याने पावसात सर्दी- खोकल्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.
कडुलिंबाची पाने हे बुरशी व कीटकनाशक म्हणून उत्त काम करतात त्यामुळे तुम्ही रोपासाठी वापर केल्यास तुळशीचे रोप जंतमुक्त राहू शकते. आपल्याला कडुलिंबाचा पाला थोडं पाणी घालून वाटून घ्यायचा आहे. हा रस आपण गाळणीने किंवा जाळीदार कापडाने गाळून घ्यावा. जेवढा रस तुमच्याकडे असेल तेवढ्यात प्रमाणात पाणी मिसळून हे द्रावण तयार करावे. हा रस आपल्याला मग थेट मातीत ओतून किंवा पानांवर स्प्रे करून घ्यायचा आहे ज्यामुळे रोपाचे कीड, कीटकांपासून संरक्षण होईल.
Video: तुळशीला बुरशी लागण्यापासून वाचवण्यासाठी..
चहा पावडर वापरून तुळशीच्या वाढीचा वेग वाढवा
@SP Gardening या अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, ४ दिवसांत रोपाच्या वाढीसाठी एक मॅजिक पदार्थ वापरायचा आहे आणि तो म्हणजे चहा पावडर. यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेच ज्या रोपांना फक्त पाने येतात त्यांना या नायट्रोजनची फार गरज असते. आपल्याला ताजी चहा पावडर वापरायची आहे. यामुळे रोपांची वाढ तर होतेच पण पाने सुद्धा छान मोठी व चमकदार होतात. साधारण अर्धा चमचा चहा पावडर आपण रोपाच्या मुळाशी घालू शकता. त्याआधी माती थोडी उकरून घ्या ज्यामुळे माती भुसभुशीत होते. महिन्यातून एकदा जरी हा प्रकार केला तरी पुरतो.