How To Use Clay Pots, Earthen Utensils: अलीकडे अनेकांना मातीच्या भांड्यांविषयी खास आकर्षण वाटू लागलं आहे. पूर्वीच्या काळी मातीच्या मडक्यापासून ते कढई, ताट, वाट्यांपर्यंत अनेक गोष्टी घरोघरी वापरल्या जायच्या. कालांतराने धातूची भांडी वापरात आली. महागाई वाढताना तांबे- पितळ्यांसारख्या महाग धातूला पर्यायी स्टील- अल्युमिनियमची भांडी वापरली जाऊ लागली. पण मागील काही वर्षात काही खास सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समुळे अनेकांना मातीच्या भांड्यांचे विशेष कौतुक वाटू लागले आहे. यातीलच एक इन्फ्लुएन्सर म्हणजे रेड सॉईल स्टोरीजचे पूजा व शिरीष गवस. अलीकडेच लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘इन्फ्लुएन्सरच्या जगात’ या विशेष कार्यक्रमात आपण या जोडीशी संवाद साधला. यावेळी पूजाने आपल्या सगळ्यांच्या मनातील एका प्रश्नाचं अगदी विस्तृत उत्तर दिलं आहे.
आपण जर रेड सॉईल स्टोरीजचे युट्युब व्हिडीओ पाहिले असतील तर आपल्याला माहित असेल की यामध्ये पूर्णतः पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या रेसिपी दाखवल्या जातात. त्यामुळे अगदी चुलीवर अन्न शिजवण्यापासून ते मातीची भांडी वापरेपर्यंत सगळं काही परंपरेला धरून केलं जातं. हीच मातीची भांडी विकत घेताना, वापरताना व स्वच्छ करताना नेमकं काय करायला हवं याविषयी पूजाने माहिती दिली आहे.
मातीची भांडी कशी निवडायची? (How To Select Clay Pots)
१) मातीचं भांडं विकत घेतानाच ते वाजवून पाहायचं. नारळ वाजवल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज यायला हवा.
२) शिवाय भांडं जाड बुडाचं हवं म्हणजेच त्याचा बेस जाड हवा अन्यथा थोडं गरम केल्यावर पण भांडं फुटू शकतं.
३) तुम्ही भांडं घरी आणल्यावर आधी १२ तास पाण्यात ठेवा
४) दुसऱ्या दिवशी ते छान उन्हात वाळवून घ्यायचं
५) अगदी मंद आचेवर मग त्यात पाणी ठेवून चूल/गॅसवर भांडं वापरायचं
मातीची भांडी स्वच्छ कशी करायची? (How To Clean Clay Pots)
गावाकडे यासाठी चुलीच्या लाकडांची राख वापरली जाते पण शहरात शक्य नसेल तर तुम्ही नारळ फोडतानाच त्याची शेंडी (किशी) काढून ठेवा त्याला मीठ लावून मग भांडं घासू शकता. लिक्विड डिशवॉश किंवा साबण वापरू नये.
लक्षात घ्या, पूर्वी चाकावर मातीची भांडी बनवली जात होती त्यामुळे त्याचा पृष्ठभाग हा जाड असायचा व भांडं फुटण्याची शक्यता कमी व्हायची. आता ती साच्यातून बनवली जात असल्याने भांडं थोडं तापवलं तरी फुटण्याची भीती असते. त्यामुळे वरील पद्धतीने त्या भांड्याला तयार करून घ्या. याला भांडं वळसावणं असंही म्हणतात.
शिवाय पूजा व शिरीषच्या गप्पा ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून कळवायला विसरू नका.