Kitchen Tips: अनेकदा किचनमधील गोष्टी कितीही काळजी घेऊनही खराब होतातच. म्हणजे बघा ना, अगदी नीट घासून पुसून रोजच्या रोज वापरूनही अनेकदा कात्री, सूरी, चाकूची धार बोथट होते. पूर्वी अशा धार गेलेल्या सुऱ्यांना, कात्रीला धार लावण्यासाठी सायकलवरून काही कामगार फिरायचे, अवघ्या काही रुपयांमध्ये ते आपल्या वस्तूंना चांगली तीक्ष्ण धार लावून द्यायचे. पण अर्थात अलीकडे असे अनेक छोटे मोठे व्यवसाय लोप पावत चालले आहेत त्यामुळे अगदी क्वचितच एखाद्या भागात असे सायकलवरून धार लावणारे कामगार येत असावेत. मग आता शेवटी आपल्याकडे उपाय काय उरतो, एकतर नवीन कात्री आणायची किंवा मग घरगुती जुगाड शोधायचे. तर आज यातला दुसरा पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
इंस्टाग्रामवर @masteringhacks या पेजवर घरच्या घरी कात्री व सुरीला तीक्ष्ण धार कशी लावायची याचा सल्ला दिला आहे. यासाठी तुम्हाला फार विशेष मेहनत घ्यायची सुद्धा अजिबात गरज नाही. सेकंदात हे काम तुम्हीही करू शकता. चला पाहूया दोन खास पद्धती
१) सुरीला धार लावायची असेल तर सर्वातआधी गॅसवर सुरीची धारदार बाजू थोडी तापवा आणि मग तुमच्याकडील एखाद्या कपला पालथा ठेवून त्यावर आडवी वरून सूरी थोडी घासा. शक्यतो कप सिरॅमिकचा असावा.
२) कात्रीला धार लावायची असेल तर आपल्याकडे घरात भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा तारेचा काथ्या कामी येऊ शकतो. कात्रीने हा काथ्या चक्क कापायचा आहे (सुरीसाठीही वापरू शकता) यामुळे तारेचे व कात्री किंवा सुरीचे घर्षण होऊन धार तीक्ष्ण होऊ शकते.
तुम्हाला हे दोन्ही जुगाड कसे वाटले हे कमेंटकरून नक्की सांगा आणि हो हे करताना तुमच्या हाताची योग्य ती काळजी घ्यायला विसरू नका. लहान मुलांच्या समोर असे प्रयोग करू नका.