How To Make Ghee In Pressure Cooker: थंडीच्या दिवसांमध्ये स्निग्ध पदार्थांच्या सेवनाने शरीर सुदृढ राहण्यास मदत होते असं म्हणतात. भारतीय घरांमध्ये थंडीच्या दिवसात तर तुपाचे महत्त्व आणखीनच वाढते. मेथीचे, सुक्या मेव्याचे लाडू, गाजर- दुधीचा हलवा, प्रसादाचा शिरा अगदी भातापासून- पोळीपर्यंत प्रत्येक गोष्टीची तुपाच्या खमंग चवीमुळे आणखीनच लज्जत वाढते. पण आता एवढी मागणी आहे म्हणजे भाव सुद्धा वाढलेले असणार हे काही वेगळं सांगायला नकोच नाही का? शिवाय एवढं महाग तूप जरी तुम्ही विकत आणलं तरी ते शुद्धच असेल, कशावरून? अशावेळी सर्वात सोपा पर्याय म्हणजे घरी तूप बनवणं. आज तर आपण वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवताना तुपाची रेसिपी पाहणार आहोत.

आजपर्यंत आपण त्याच कढवण्याच्या पद्धतीने तूप बनवलं असेल. कधी या प्रयत्नात कढई करपते तर कधी कित्येक तास उभं राहून लक्ष देताना पायाची पुरती वाट लागते. पण आज आपण अगदी कमी वेळात कुकर मध्ये तूप कसे तयार करता येईल हे पाहणार आहोत.

प्रेशर कूकरमध्ये तूप कढवण्याची सोपी पद्धत

१) सगळ्यात आधी नेहमीप्रमाणेच आपल्याला साय जमा करावी लागणार आहे. जेव्हा तुम्ही तूप कढवायला घ्याल तेव्हा अर्धा तास आधी मलाई फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा, प्रेशर कुकर मध्ये ही साय चांगली पसरवून घ्या. मग अर्धा तास ठेवून त्यात अर्धा पेला पाणी टाका व गॅस सुरु करा.

२) प्रेशर कुकरचं झाकण लावून तीव्र आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्या. कुकर साधारण थंड होत आला की झाकण खोला आणि पुन्हा मध्यम आचेवर कुकर ठेवा. तुमच्या लक्षात येईल की दूध फाटल्याप्रमाणे मलाईचे गोळे तयार व्हायला सुरुवात होईल.

३) मग यामध्ये चिमूटभर गोड सोडा घालून चमच्याने चांगलं ढवळून घ्या. सोडा पर्यायी आहे ज्याचा वापर फक्त तुपाचा दर्प घालवण्यासाठी व तूप जास्त काळ टिकवण्यासाठी होतो. आपल्याला करपट वास घालवायचा असेल तर सुपारी किंवा विड्याचे पान सुद्धा घालू शकता.

४) तूप कढवताना यात १ चमचाभर पाणी घालायला विसरू नका यामुळे छान दाणेदार तूप बनेल.

५) शेवटी तुम्हाला माव्यासारखा रवाळ भाग कुकरमध्ये दिसेल, त्याला किंचित तपकिरी होऊ द्या मग उर्वरित तूप गाळणीने गाळून भांड्यात भरून ठेवा.

तुम्हाला ही सोपी पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader